Thane News : ठाणे महापालिका (Thane Mahapalika) कार्यक्षेत्रातील वर्तकनगर येथील एका खाजगी शाळेतील सुमारे 160 मुलं सहलीला गेले असताना 55 ते 60 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीदरम्यान अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्ती आणि शाळा प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील (Krishna Dadu Patil) यांनी जिल्हाधिकारी आणि शाळा प्रशासन तसेच महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती
खासगी शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना 1 व 2 जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ येथे एका विज्ञान विषयक कार्यक्रमासाठी 160 मुलांना त्या खासगी शाळेतर्फे नेण्यात आले होते. या प्रवासादरम्यान शाळा प्रशासनाने ठरवून दिलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, हा आहार घेतल्यानंतर तब्बल 55 ते 60 विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. परिस्थिती बिघडल्याने अनेक विद्यार्थ्यांना ठाण्यातील इतर खाजगी रुग्णालयांमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करावे लागले. यामुळे पालक वर्गात प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे.
विषबाधेचे नेमके कारण काय? यासाठी कोण दोषी आहे? याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
या घटनेनंतर शाळा प्रशासनाने आपली चूक सुधारण्याऐवजी अत्यंत बेजबाबदार भूमिका घेतली असून”तुमच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी पॉवर) कमी आहे,” असे सांगून शाळा प्रशासन पालकांना गप्प करण्याचा आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. एकाच वेळी 55 हून अधिक मुलांना त्रास होणे हा केवळ वैयक्तिक इम्युनिटीचा भाग असूच शकत नाही, हे स्पष्ट असतानाही शाळा आपली जबाबदारी झटकत आहे.उपमहापौर कृष्णा पाटील यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून, शाळा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याऐवजी पालकांकडे दुर्लक्ष केल्याचे पत्रात म्हटले आहे. विषबाधेचे नेमके कारण काय? यासाठी कोण दोषी आहे? याची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणली पाहिजे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अशी मागणी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी लावून धरली आहे. शाळा प्रसरणला संपर्क साधल्या असताना शाळा प्रशासनाने या घटनेबाबत कुठलाही प्रकारचे उत्तर दिले नाही असे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सांगितले.
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ