Last Updated:
धोका एवढा स्पष्ट आणि भीषण होता की, प्रशासनाने त्या इमारतीखालील पार्किंगमधील सर्व वाहने आधीच सुरक्षित ठिकाणी हलवली होती आणि तिथे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेचे बचावकार्य अजूनही सुरू आहे. दरम्यान आता या घटनेतून बचावलेल्या एका व्यक्तीने अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. तिथे मृत्यू डोळ्यांसमोर दिसत होता… दोन-तीन दिवसांपासून ढिगाऱ्यातून कचरा खाली सरकत होता. इतकंच नाही तर यासंदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चर्चाही झाली. मात्र, यावेळी तिथल्या माणसांचा विचार करण्याआधी गाड्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पार्किंग रिकामी करण्यात आली. मोशी येथील कचरा डेपोच्या कचऱ्याचा डोंगर कोसळल्याच्या भीषण दुर्घटनेतून मृत्यूला हुलकावणी देऊन वाचलेले जखमी कामगार विजय सपकाळ यांनी शुक्रवारी केलेला हा खुलासा ऐकून संपूर्ण पिंपरी-चिंचवड हादरून गेले आहे.
जखमी विजय सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी परिसरात दुर्घटनेपूर्वी सलग तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे कचऱ्याचा डोंगर भुसभुशीत झाला होता आणि त्यातून मलबा सातत्याने खाली घसरत होता. धोका एवढा स्पष्ट आणि भीषण होता की, प्रशासनाने त्या इमारतीखालील पार्किंगमधील सर्व वाहने आधीच सुरक्षित ठिकाणी हलवली होती आणि तिथे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता. जर प्रशासनाला गाड्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पार्किंग रिकामी करण्याची सुबुद्धी सुचली होती, तर त्याच इमारतीत मृत्यूच्या छायेखाली काम करणाऱ्या शेकडो कामगारांना बाहेर काढण्याचा निर्णय का घेण्यात आला नाही? गाड्यांची किंमत माणसांच्या जिवापेक्षा जास्त होती का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. प्रशासनाला आणि ‘वेस्ट टू एनर्जी’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना संभाव्य दुर्घटनेची पूर्ण कल्पना होती, तरीही कामगारांना त्या ‘डेथ ट्रॅप’मध्ये का ढकलण्यात आले? हा थरारक प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
बुधवारी सकाळी जेव्हा कचरा मोठ्या प्रमाणावर कोसळायला लागला, तेव्हा कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येऊन दुपारपर्यंत मोठा राडारोडा खाली पडू शकतो यावर चर्चा करत होते. उपाययोजना काय करायच्या, याचे कागदी घोडे नाचवले जात होते. परंतु, संभाव्य विनाशाची पूर्वकल्पना असूनही प्रत्यक्ष कृती मात्र शून्य होती. काम तात्काळ बंद करून इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्याऐवजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांच्या याच हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे अखेर कचऱ्याचा तो महाकाय डोंगर इमारतीवर कोसळला आणि निष्पाप कामगारांचा जीव धोक्यात आला. या दुर्घटनेत 18 जण अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी आठ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर घटनेला ६५ तास उलटूनही सात ते आठ जणांचा शोध अद्याप सुरू आहे. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं जात आहे.
Pune,Maharashtra
Jul 11, 2026 11:50 AM IST
मोशी दुर्घटना: सकाळीच दिसलेला तो धोका; घाईघाईत पार्किंगमधली वाहनं काढली, पण माणसांचं काय? बचावलेल्या कामगाराचा हादरवणारा खुलासा
