Dhairyasheel Mohite Patil: गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींच्या गुंडगिरीच्या आणि अरेरावीच्या घटना वारंवार समोर येत असतानाच, आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका वादग्रस्त प्रकरणाची भर पडली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP Sharad Pawar) माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (MP Dhairyasheel Mohite Patil) यांची एक कथित आणि वादग्रस्त ऑडिओ क्लिप (Audio Clip) सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये समोरच्या व्यक्तीला थेट हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आल्याचे ऐकायला मिळत असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Dhairyasheel Mohite Patil: सुरुवातीला पीएने फोन जोडला, नंतर खासदारांचा थेट दम
व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपच्या सुरुवातीला खासदारांचे पीए समोरच्या व्यक्तीला फोन जोडून देताना दिसतात. “खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब तुमच्याशी बोलत आहेत,” असे पीए समोरच्याला सांगतो. त्यानंतर फोनवर आलेल्या खासदारांनी सुरुवातीला अत्यंत आक्रमक स्वरात, “तुझ्याकडे शिवराजला पाठवून देतोय, सर्व कागदपत्रे तयार करून उद्या माझ्याकडे यायचे,” असा आदेश दिला.
Dhairyasheel Mohite Patil: अश्लील भाषेत शिवीगाळ
खासदारांनी उद्या भेटायला बोलावल्यानंतर समोरच्या व्यक्तीने आपण सध्या सोलापुरात (Solapur) असल्याचे सांगितले. ही गोष्ट ऐकताच समोरच्या व्यक्तीवर खासदारांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी अत्यंत अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, “तू उद्या जर आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन,” असा सज्जड दम आणि धमकी खासदारांनी दिल्याचे या कथित ऑडिओमध्ये ऐकू येत आहे.
Dhairyasheel Mohite Patil: खासदारांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष
या व्हायरल व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपनंतर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या भाषेवर आणि वाढत्या गुंडगिरीवर सर्वसामान्य जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण वादग्रस्त प्रकरणावर आणि व्हायरल क्लिपवर अद्याप खासदार धैर्यशील मोहिते पाटील किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ