Ekvira Mandir Closed: एकविरा देवी मंदिर ‘या’ तीन दिवशी बंद, मोठी अपडेट समोर | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

कार्ला गडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. मात्र, मावळ परिसरातील संततधार आणि अतिवृष्टीमुळे डोंगराचा काही भाग आणि पायऱ्यांच्या बाजूचा रस्ता दोन वेगवेगळ्या ठिकाणी खचला आहे.

एकविरा मंदिर कार्ला लेणी लोणावळा
एकविरा मंदिर कार्ला लेणी लोणावळा

अनिस शेख, प्रतिनिधी, मावळ : मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिरालाही बसला आहे. अतिवृष्टीमुळे मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांलगत दोन ठिकाणी रस्ता खचल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे तीन दिवस श्री एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार असून या तीन दिवसांत कोणत्याही भाविकाला गडावर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच घाटमार्गावर वाहनांनाही प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. एकविरा देवस्थान ट्रस्टने भाविकांनी या निर्णयाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे आणि ही माहिती इतर भाविकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले आहे.

कार्ला गडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. मात्र, मावळ परिसरातील संततधार आणि अतिवृष्टीमुळे डोंगराचा काही भाग आणि पायऱ्यांच्या बाजूचा रस्ता दोन वेगवेगळ्या ठिकाणी खचला आहे. दरड कोसळण्याची किंवा अधिक रस्ता खचण्याची भीती निर्माण झाल्याने देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. भाविकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

तीन दिवस भाविकांना आणि वाहनांना गडावर बंदी

दुरुस्तीचे काम सुरू असेपर्यंत गडावर पर्यटकांना आणि भाविकांना जाण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. ११ ते १३ जुलै दरम्यान मंदिर पूर्णपणे बंद राहील. या तीन दिवसांत कोणत्याही भाविकाला गडावर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मुख्य घाटमार्गावरून गडाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनाही प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. घाट रस्त्यावर बॅरिकेड्स लावून पोलीस आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

देवस्थान ट्रस्टचे सहकार्याचे आवाहन

अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि सुरू असलेले दुरुस्तीचे काम लक्षात घेता भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. ठरवलेल्या तीन दिवसांच्या कालावधीत गडावर येणे टाळावे आणि ही महत्त्वाची माहिती इतर भाविकांपर्यंत तसेच नातेवाईकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही, असे आवाहन श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व भाविकांना केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *