Bigg Boss fame Kunika Sadanand Reaction on CM Devendra Fadanvis: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 7 हजार कोटी रुपये खर्चाच्या, 14 किलोमीटर लांबीच्या ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाच्या स्लॅबवर दरड कोसळल्याने राज्यभरातून सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुर्घटनेवरून प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत ‘भाड्याचे टट्टू’ म्हटल्याने राजकीय वर्तुळासह कलाविश्वातूनही प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर बिग बॉस फेम अभिनेत्री कुनिका सदानंदने केलेली पोस्ट चर्चेत आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या स्लॅबवर संततधार पावसामुळे दरड कोसळली. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मिसिंग लिंकवरून वाहतूक पावसामुळे काही काळ बंद करण्यात आलेली. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची झोड उठवणाऱ्या विरोधकांना “1 कोटी खोटारडे मेल्यानंतर हे पैदा झाले” आणि “भाड्याचे टट्टू” असे शब्द वापरत सुनावले. त्यांच्या या वक्तव्यावर ‘बिग बॉस’फेम अभिनेत्री कुनिका सदानंदने पोस्ट केली आहे. अधिवेशनातील Video शेअर करत प्रश्न विचारणाऱ्यांना ‘भाड्याचे टट्टू’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
कुनिका सदानंदची संतप्त प्रतिक्रिया
“जरा विचार करा, प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना एक मुख्यमंत्री ‘भाडे के टट्टू’ म्हणत आहेत. आधी आम्ही झुरळं होतो, आता हे, पुढे काय होणार? एखादा नवीन अपमान शोधून ठेवा. आणि हो सर, सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. तुम्ही म्हणजे काही महाराष्ट्र नाही, तुम्ही महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्यासाठी निवडून आलेले आहात. हा फरक समजून घ्या.’
“लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणे हा बदनामीचा प्रकार नाही! हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पातील अवघ्या दोन महिन्यांत झालेल्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न उपस्थित केले असता, मुख्यमंत्री त्यांना ‘पैसे घेणारे ट्रोल’ म्हणतात, ही बाब निषेधार्ह आहे.” अशी पोस्ट कुनिका सदानंदने केलीय.