Vastu Tips for Birthday Gifts : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खूप खास दिवस असतो. या प्रसंगी परिवार आणि नातेवाईक, मित्र-मंडळी आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतात. सहसा भेटवस्तूंची निवड आवडी निवडी आणि गरजांनुसार केली जाते. पण, वास्तूशास्त्रानुसार अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे की, ज्या वाढदिवसाच्या दिवशी भेट म्हणून न देण्याचा सल्ला दिला जातो. असं म्हणतात की, नकारात्मक ऊर्जा, नात्यात दुरावा आणि आर्थिक स्थिती यामुळे आपल्याला मानसिक ताण येतो. मात्र, वास्तूशास्त्रानुसार, अशा काही गोष्टी आहेत ज्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष भेट म्हणून देणं टाळावं. या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊयात.
धारदार वस्तू देणे टाळा
वास्तूशास्त्रानुसार, चाकू, कात्री, तलवार अशा धारदार वस्तू वाढदिवसाच्या दिवशी भेटवस्तू म्हणून देणं टाळा. मान्यतेनुसार, अशा भेटवस्तू नात्यात मतभेद आणि दुरावा निर्माण करू शकतात. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी अशा भेटवस्तू देणं शुभ मानलं जात नाही.
काळ्या रंगाच्या वस्तू देणं टाळा
वास्तूशास्त्रानुसार, वाढदिवसाच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू देणं शुभ मानलं जात नाही. अशा वेळी हलक्या, तेजस्वी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या रंगांच्या भेटवस्तू देणं शुभ मानलं जातं.
रिकामे पाकिट न देणे
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पर्स किंवा वॉलेट गिफ्ट करणार असाल तर ते रिकामं देऊ नका. वास्तूशास्त्रानुसार, रिकामं पर्स आर्थिक नुकसानीचे प्रतीक मानले जाते. यासाठी पर्समध्ये किमान एक नाणं तरी टाकावं. याने सुख-समृद्धी नांदते. तसेच, पैशांची भरभराट होते.
सुकी किंवा काटेरी झाडे देऊ नका
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला झाड भेटवस्तू म्हणून देत असाल तर ती हिरवीगार असतील तरच द्या. ते सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. वास्तूशास्त्राच्या मते, सुकलेली, कोमेजलेली आणि काटेरी झुडपं देणं टाळा. या व्यतिरिक्त तुळस, बांबू वनस्पती या व्यतिरिक्त अन्य ताजी झुडपं शुभ मानली जातात.
देवाची मूर्ती देण्याआधी या गोष्टींचं भान ठेवा
अनेकदा लोक वाढदिवसाच्या दिवशी देवाचे फोटो किंवा मूर्ती भेट म्हणून देतात. धार्मिक मान्यतेनुसार, अशी मूर्ती किंवा चित्र भेट म्हणून तेव्हाच द्यावे, जेव्हा ती स्वीकारणारी व्यक्ती तिची नित्यनियमाने पूजा करण्यास किंवा तिची योग्य निगा राखण्यास समर्थ असेल. योग्य विचार न करता धार्मिक वस्तू भेट देणं योग्य मानलं जात नाही.
वाढदिवसाला कोणती भेटवस्तू देणं शुभकारक?
वास्तूशास्त्रानुसार, वाढदिवसानिमित्त पुस्तकं, रोपं, सुगंधी फुलं, चांदीचं नाणं, शोभेच्या वस्तू, घरातील उपयुक्त वस्तू किंवा ज्याला भेटवस्तू द्यायची आहे त्याच्या गरजेनुसार निवडलेली भेटवस्तू देणे शुभकारक मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी जुलैचा दुसरा आठवडा ठरणार गेमचेंजर; 6 पैकी 5 राशी होतील मालामाल, साप्ताहिक राशीभविष्य