Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार


नवी दिल्ली : राज्यसभेच्या पश्चिम बंगालमधील रिक्त जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव, सुखेंदु रे आणि प्रकाश बराईक या खासदारांनी राजीनामा दिल्यानं या जागा रिक्त झाल्या होत्या. आज सुष्मिता देव, सुखेंदु रे आणि प्रकाश बराईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच या तिघांना राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील भाजपचं संख्याबळ पाहता या तीन जागांवर भाजप विजय मिळवणार हे स्पष्ट आहे. यामुळं राज्यसभेत भाजपचं संख्याबळ 3 ने वाढेल. तर, एनडीए राज्यसभेत दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार आहे.  

राज्यसभेत भाजपचे तीन खासदार वाढणार

पश्चिम बंगालमधील तीन राज्यसभा जागांवर भाजपकडून तृणमूल सोडलेल्या तिघांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या राज्यसभेत एनडीएकडे 154 खासदार आहेत  दोन तृतीयांश बहुमतासाठी एनडीएला आणखी 9 खासदारांची आवश्यकता आहे. तृणमूल काँग्रेसचा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षात फूट पडली होती. त्यानंतर सुष्मिता देव, सुखेंदु रे आणि प्रकाश बराईक यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. 

भाजपकडून उमेदवार जाहीर 

सुष्मिता देव, सुखेंदु रे आणि प्रकाश बराईक या खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार NCPI या पक्षात विलीन झाले आहेत. दुसरीकडे आमदारांमध्ये दोन गट पडले असून बहुतांश आमदार फुटीर गटासोबत असून ममता बॅनर्जींच्या गटाकडे कमी संख्येनं आमदार राहिले आहेत, त्यामुळं भाजपचे उमेदवार राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी होणार हे स्पष्ट आहे. 

सुष्मिता देव यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत होता. तर,  सुखेंदु रे आणि प्रकाश बराईक यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत असताना त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता.  त्यानंतर आता तीन राज्यसभा जागांवर भाजपने तृणमूल सोडून पक्षात दाखल झालेल्या तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 294 पैकी 207 जागांवर विजय मिळवला आहे. तर, 80 जागांवर तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला होता. ममता बॅनर्जी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर एकेकाळी तृणमूल काँग्रेसमध्ये असणारे आणि नंतरच्या काळात भाजपमध्ये दाखल झालेले शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले.  पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून ममता बॅनर्जी यांची राजकीय ताकद कमी झाली आहे. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *