Last Updated:
Sunita Ahuja Lock Upp 2: सुनीता आहुजा बऱ्याचदा पती गोविंदाच्या जुन्या प्रेमप्रकरणांबद्दल आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना दिसतात. याच मुद्द्याचा फायदा घेत शिल्पाने सुनीता यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
मुंबई: टीव्ही जगतातील सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो ‘लॉक अप सीजन २’ मध्ये रोज नवनवीन भूकंप पाहायला मिळत आहेत. त्यातच आता घरामध्ये ‘अंगुरी भाभी’ म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली आहे. शिल्पाच्या येण्याने शोमध्ये आधीच वादळ आले होते, पण एका एपिसोडमध्ये थेट बॉलीवूड सुपरस्टार गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांच्या कौटुंबिक आयुष्यावर बोट ठेवले. मग काय, नेहमी बिंधास्त राहणाऱ्या सुनीता यांचा पारा इतका चढला की त्यांनी थेट शिल्पाची लायकी काढत तिला खडे बोल सुनावले.
शिल्पावर संतापल्या सुनीता आहुजा
सुनीता आहुजा बऱ्याचदा पती गोविंदाच्या जुन्या प्रेमप्रकरणांबद्दल आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना दिसतात. याच मुद्द्याचा फायदा घेत शिल्पाने सुनीता यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. शिल्पा म्हणाली, “आम्ही गोविंदाजींचे खूप मोठे फॅन आहोत, तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, मग तुम्ही असा निर्णय कसा घेऊ शकता?” शिल्पाचे हे बोलणे ऐकून सुनीता प्रचंड चिडल्या. त्या म्हणाल्या, “जास्त बकवास करू नकोस. जेव्हा स्वतःवर येईल, तेव्हा समजेल. आधी माझ्या जागी उभी राहून बघ आणि मग मला जज कर. माझ्या आयुष्याचे नियम मी स्वतः ठरवते. गोविंदा माझा नवरा आहे, तो १० ठिकाणी जरी गेला तरी मी त्याला सोडणार नाही. मी मरेपर्यंत त्याच्यावरच प्रेम करेन.”
शिल्पासोबत झालेल्या या मोठ्या राड्यानंतर सुनीता आहुजा यांचा राग शांत झाला नव्हता. त्यांनी सह-स्पर्धक राम कपूरजवळ बसून आपला तीव्र संताप व्यक्त केला. शिल्पावर तिखट शब्दांत निशाणा साधत सुनीता म्हणाल्या, “ती कोण लागून गेली मला शिकवणारी? माझा नवरा काय करतोय, याच्याशी तिचा काय संबंध? माझ्या कुटुंबाविषयी बोलण्याचा अधिकार तिला कोणी दिला? ती इथे फक्त लोकांना उकसवण्यासाठी आणि मर्यादा ओलांडण्यासाठी आली आहे. जर तिने माझ्याशी पंगा घेतला, तर मी तिला तिची जागा दाखवून देईन. माझा नवरा ५० अफेअर्स करो, तुझ्या बापाचं काय जातंय?”
सुनीता आहुजा झाल्या भावुक
या वादळानंतर घरात सुनीता यांचा एक भावनिक चेहराही पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून घरात जेवणावरून चाललेल्या त्रासामुळे सुनीता यांना रडू कोसळले. त्यांनी होस्ट रितेश देशमुखसमोर ढसाढसा रडत, “मला आता माझ्या घरी, माझ्या मुलांकडे जायचे आहे,” अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा रितेशने एका खऱ्या मित्रासारखे त्यांना सांभाळले आणि धीर दिला. दरम्यान, या आठवड्यात सुनीता आहुजा सुरक्षित (Safe) असून, त्यांच्या या बेधडक आणि स्वाभिमानी अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली आहे.
Mumbai,Maharashtra
Sunita Ahuja: आधी केले चिटींगचे आरोप, आता केला त्याचाच बचाव; गोविंदासाठी Lock Upp मध्ये भिडली सुनीता आहुजा
