मला माझ्या बापाला मरताना पहायचं नाहीये..; ‘सैराट’मधल्या सल्याकडून मदतीसाठी विनंती – Marathi News | Sairat fame salya aka Arbaj Shaikh cries for saving fathers life alleges private hospitals emotional video


नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सल्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अरबाजच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयाकडून होणारी पैशांची लूट पाहून त्याने वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यंत भावूक झालेला अरबाज या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना मदतीची विनंती करतोय. मला माझ्या बापाला मरताना पहायचं नाहीये, मला काहीही करून त्यांना वाचवायचं आहे, असं म्हणताना त्याला रडू कोसळलं आहे.

काय म्हणाला अरबाज?

“नमस्कार मी अरबाज शेख. मी आता सोलापुरातल्या नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे आठ दिवसांपूर्वी त्यांना आम्ही सोलापुरातल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. या रुग्णालयाचा अनुभव आम्हाला इतका घाण आला की, जेव्हा आम्ही त्यांना इथे अॅडमिट केलं, तेव्हा सुरुवातीला आम्हाला 10 हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं, ते आम्ही भरले. जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिट्ठ्या दिल्या, की या गोळ्या आपल्याला लागतील. मी त्यांना विचारलं की या मी बाहेरून आणू शकतो का, तर ते म्हणाले की नाही, तुम्हाला ते आमच्या मेडिकलमधूनच घ्यावे लागतील. काही इंजेक्शन्स असतील तर तेसुद्धा इथूनच घ्यावे लागतील,” असं त्याने सांगितलं.

पहा व्हिडीओ-

या व्हिडीओत तो पुढे म्हणाला, “रुग्णालयाच्या मेडिकलमधून गोळ्या घेतल्या, तेव्हा त्यांचा बिल 40 हजार रुपयांपेक्षा अधिक झाला. याच्याआधी आम्ही पप्पांना जिथे दाखल केलं होतं, तिथे आम्हाला बाहेरून गोळ्या घेता येत नव्हत्या. हे चाळीस हजारांचं बिल बाहेरून कदाचित वीस हजारांपर्यंत झालं असतं. पण इथे एवढी लूट होतेय, माझ्या बापाला मला मरताना पहायचं नाहीये. म्हणून त्यांना मला या रुग्णालयातून दुसरीकडे शिफ्ट करावं लागतंय. इथला माझा अनुभव खूपच वाईट आहे. जाणकरांनी मला सांगावं की माझ्या वडिलांना उपचारासाठी कुठे दाखल करावं? मला आता काहीच कळत नाहीये, पण माझ्या बापाला मला काहीही करून वाचवायचं आहे. मला प्लीज मदत करा.”

अरबाजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. वडिलांच्या उपचारासाठी त्याने आर्थिक मदत मागितली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *