Last Updated:
Pune News: सपना आणि दीपक पारधी हे आठ दिवसांपूर्वी थोरांदळे येथील शेतात मजुरीसाठी आले होते. मंगळवारी सकाळी सपना पारधी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आली.
सचिन तोडकर, प्रतिनिधी, आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील गुंडवस्ती परिसरात ३५ वर्षीय सपना दीपक पारधी या महिलेचा डोक्यात वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणानंतर तिचा पती दीपक पारधी फरार झाला असून, मंचर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
सपना आणि दीपक पारधी हे आठ दिवसांपूर्वी थोरांदळे येथील शेतात मजुरीसाठी आले होते. मंगळवारी सकाळी सपना पारधी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मंचर पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत.
घटना नेमकी कशी उघडकीस आली?
सपना पारधी आणि तिचा पती दीपक पारधी हे सुमारे आठ दिवसांपूर्वी चांडोली येथील शेतकरी किसन इंदोरे यांच्या थोरांदळे येथील शेतात मजुरीच्या कामासाठी आले होते. मंगळवारी सकाळी शेजारील शेतकरी दत्तात्रय बारवकर शेतीवर फेरफटका मारून ते राहत असलेल्या पत्र्याच्या शेडकडे गेले असता, शेडबाहेरील कोपीत सपना पारधी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या दोन्ही चपला अस्ताव्यस्त पडल्या होत्या. दत्तात्रय बारवकर यांनी आवाज दिला, मात्र कोणतीही हालचाल न झाल्याने जवळ जाऊन पाहिले असता तिच्या डोक्यावर धारदार अथवा कठीण हत्याराने वार केल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस पाटील वैशाली टेमगिरे व उपसरपंच ॲड. संदीप टेमगिरे यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी महिलेला मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर पती संशयित आरोपी दीपक पारधी फरार झाला असून, खुनामागील नेमके कारण काय, याचा तपास मंचर पोलीस करीत आहेत.
Pune,Maharashtra
