मुंबई : राज्यात एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (NCP) फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, जयंत पाटील यांनीही या भेटीचे वृत्त मान्य केलं आहे. त्यामुळे, या भेटीनंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीत सहभागी होणार, त्यांच्या वाट्याला काय मिळणार याची चर्चा सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिल्लीतून स्पष्टपणे माहिती दिली. कुठलाही नवीन पक्ष महायुतीत येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत येणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर, ही बातमी तुम्ही तयार केलेली आहे. महाराष्ट्रातून NDA मध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. कुठलाही नवा पक्ष आता राज्यात महायुतीत येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, आम्ही सोबतच्या कोणालाही सोडणार नाही, शरद पवार यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदार यांना आम्ही तोडणार नाहीत, असेही फडणवीस यांनी आज दिल्लीतून सांगितले.
जयंत पाटलांसोबत काय झाली चर्चा?
भाजप नेते विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यातील चर्चेनंतर जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांमध्येही याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत महायुतीसोबत येत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय? असणार याबाबत चर्चा झाल्याची माहिती ‘एबीपी माझा’ला विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, याबाबत जयंत पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याचं मान्य केले. मात्र, बैठकीत अनौपचारिक चर्चा पार पडल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळणार – मुख्यमंत्री
नर्मदा प्रकल्पाच्या अनुषंगाने आज बैठक पार पडली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. वेगवेगळ्या राज्यांना पैसे द्यायचे आहेत, त्यावर काही वाद आहेत, त्यावर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पातून महाराष्ट्राला वीज मिळाली पण 10 TMC पाणी मिळालं नाही हा मुद्दा मी मांडला. 10 TMC पाणी देण्याचं जे आश्वासन दिलं होतं त्यावर आज निर्णय झाला. उकळीमधून 3-4 महिने पाणी उचलण्याची तयारी गुजरातने दाखवली आहे. ह्या प्रकल्पामधून राज्याला एक थेंब देखील पाणी मिळत नव्हतं, राज्याच्या हिस्स्याच 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग आजच्या बैठकीत मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुनर्वसन पूर्णपणे संपलं आहे, 2008 साली राज्याने जामीन दिली होती हा मुद्दा मांडला. या पाण्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळणार आहे, मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे देखील बैठक झाली. कुसुमच्या माध्यमातून मोठा निधी मिळाला आहे, निधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानले. नव्या योजनेतून राज्याला निधी मिळवा अशी विनंती देखील केली.
नंदूरबार जिल्ह्याला फायदा
राज्याला मोठं टार्गेट द्यावं यावर चर्चा झाली, नदीजोड प्रकल्प हा राज्याला फायदेशीर आहे. कोल्हापूर आणि सांगली मधून फ्लाड डायरेक्टन सुरू केल्याने मराठवाड्याला फायदा होईल. तसेच, आता 10 TMC पाणी मिळालं असल्याने नंदुरबार जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे, उकळीतून पाणी दिलं तरच फायदा होईल हा मुद्दा आहे, प्रामुख्याने मांडला असून डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टनंतरच बाकी गोष्टी समोर येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा