आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 


Eknath Shinde :  राज्यतील काही भागात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबई-पुण्यासह कोकणात पावसाची संततधार सुरु असून नदी-नाले आणि बहुतांश भाग जलमय झाले आहे. अशातच राज्यातील वारकऱ्यांसाठी श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत इंद्रायणी नदीला पूर (Alandi Flood News) आला आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळं अनेक भागात पुराचं पाणी शिरलं होतं. त्यामुळं  मोठं नुकसान झालं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आळंदीच्या पूरग्रस्त पुनर्बांधणीसाठी 10 कोटींची विशेष मदत जाहीर केली आहे. 

पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण केंद्र, रस्ते, पूल, पथदिवे, सार्वजनिक शौचालये आणि अन्य नागरी सुविधा करण्यात येणार

आषाढी वारीदरम्यान पुरामुळे झालेल्या नुकसानीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र आळंदीसाठी 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण केंद्र, रस्ते, पूल, पथदिवे, सार्वजनिक शौचालये आणि अन्य नागरी सुविधांची तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून, वारकरी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाकडून सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे. सध्याची पूर परिस्थिती निवळेपर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला (Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Prasthan) आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुणे जिल्हा आणि विशेषतः मावळ, देहू व आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदीची दोन्ही पात्रे दुथडी भरून वाहत असून आळंदी व देहू परिसरातील अनेक महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत. इंद्रायणी नदीची वाढती पातळी आणि मुसळधार पाऊस पाहता वारकऱ्यांनी देहू आणि आळंदी येथे गर्दी न करता थेट पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून किंवा त्यापुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, दोन्ही देवस्थान संस्थानने केले आहे. आज तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान होत आहे. आज पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी राहणार आहे. तर उद्या म्हणजे 8 जुलैला माउलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. बुधवारी पालखीचा मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यात असणार आहे. यादिवशी तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी पोहोचणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *