Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?


पुणे : आळंदी आणि देहू या ठिकाणी निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे वारकऱ्यांची राहण्याची सोय पुणे शहरातील पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या (Pune News) १०१ शाळांना पुढचा आठवडाभर सुट्टी देण्यात आली आहे. मात्र शहरातील महापालिकेच्या इतर शाळा आणि सर्व खाजगी शाळा या कालावधीत सुरू राहणार आहेत. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेच्या हद्दीतील तब्बल १०१ शाळांना थेट रविवारपर्यंत पूर्ण सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.(Pune News)

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी या वारीत सामील झाले आहेत.  मात्र, गेल्या चार पाच दिवसांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देहू आणि आळंदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर संकटामुळे आळंदीत अडकलेल्या हजारो वारकरी आणि भाविकांच्या राहण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या संकटात वारकऱ्यांना सुरक्षित आश्रय देण्यासाठी पुणे महापालिकेने तातडीने पावले उचलली आहेत. आळंदी आणि देहू परिसरातील पुराचा फटका बसलेल्या या वारकऱ्यांची आणि भाविकांची सोय थेट पुणे शहरात करण्यात आली आहे. वारीसाठी पुणे शहरात दाखल होणाऱ्या आणि पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या राहण्यासाठी पुणे महापालिकेच्या तब्बल 100 पेक्षा जास्त शाळा तात्पुरत्या निवासस्थानात रूपांतरित करण्यात आल्या आहेत. 

या शाळांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची, खाण्याची आणि आरोग्याची संपूर्ण व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. याच सामाजिक आणि धार्मिक भान राखत प्रशासनाने या 101 शाळांमधील विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वारकऱ्यांच्या निवासात कोणताही अडथळा येणार नाही. 

Pune News: मंजुषा नागपुरे नेमकं काय म्हणाल्या?

आळंदी देवस्थान प्रमुख आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलंय की, इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे तिकडचे सगळे ब्रिजेस पाण्याखाली गेलेत, तर वारकऱ्यांना आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की आपण आळंदी देवस्थानाकडे न जाता पुण्यालाच यावं आणि इथे थांबावं. तर त्यासाठी आता पुणे महानगरपालिकेकडून येणाऱ्या वारकऱ्यांची आपण सगळी व्यवस्था करतोय. साधारण पुणे महानगरपालिकेच्या १०१ शाळांमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. आणि आजपासून पुढे रविवारपर्यंत त्या सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

सगळ्या पुणे शहरासाठी जे काही पाणी कपात होतं ते रद्द केलंय. पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल आणि रविवारनंतर पुन्हा पाण्याची व्यवस्था कशी आहे, त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. सगळीकडे टॉयलेट्सची सुद्धा व्यवस्था झालेली आहे. तीन ठिकाणी मोठे जर्मन हँगर्सचे मांडव घालून झालेले आहेत जिथे वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते आणि पोलीस ट्रॅफिक पोलिसांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे की वारकरी आपल्याकडे येतील लवकरच त्यामुळे संपूर्ण शहराची ट्रॅफिकची व्यवस्था सुरळीत असावी, असं महापौरांनी म्हटलं आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *