Last Updated:
नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळले, धोकादायक ढग अहिल्यानगर आणि सुरतकडे सरकले. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
लक्ष्मण घाटोळ: गेल्या २४ तासांपासून ढगफुटीच्या आणि महापुराच्या सावटाखाली जगणाऱ्या नाशिककरांसाठी अखेर एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरावर घोंगावणारे अतिवृष्टीचे आणि ढगफुटीसदृश पावसाचे मोठे संकट तूर्तास टळले आहे.
हवामान खात्याने नाशिकला रेड अलर्ट दिला असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण होते, मात्र निसर्गाने नाशिककरांना मोठा दिलासा दिला आहे. इगतपुरी, पंचवटी, त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याच्या प्रवाहामुळे सोमवारी पालघरमध्ये तब्बल ४५० मिलिमीटर इतका धुवाँधार पाऊस पडला होता. हाच वाऱ्याचा प्रवाह पुढे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पट्ट्यात सरकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
मात्र, वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हे धोकादायक ढग आता नाशिक सोडून अहिल्यानगर (अहमदनगर) आणि गुजरातच्या सुरत शहराच्या दिशेने पुढे सरकले आहेत. त्यामुळे नाशिकवरील थेट ढगफुटीचा धोका आता टळला आहे.

नाशिकवरचे संकट तूर्तास टळले असले, तरी प्रशासनाने नागरिकांना गाफील न राहण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना दोन अत्यंत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. हवामानातील बदल पाहता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील धबधबे, नद्या किंवा घाटमाथ्यावर पर्यटनासाठी जाणे पूर्णपणे टाळावे. वाऱ्याच्या वेगामुळे पावसाचा जोर कमी-जास्त होत असला, तरी नाशिक जिल्हा प्रशासन अजूनही पूर्णपणे ‘अलर्ट मोड’वर आहे. संकट टळल्याने नाशिककरांनी सुटकेचा श्वास सोडला असला, तरी पुढील काही तास खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
Mumbai,Maharashtra
