Khashaba : नागराज मंजुळेंचा ‘खाशाबा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; 19 पुरावे न्यायालयात दाखल – Marathi News | Nagraj Manjule film Khashaba copyright dispute in court writer Sanjay Dudhane alleges film is based on his book Olympicveer Khashaba Jadhav


नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या टीझरमधील पाच दृश्ये ही लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील असल्याचा दावा केला जात आहे. हा वाद कोर्टात पोहोचला असून पुणे दिवाणी न्यायालयाने चित्रपटावरील कॉपीराइट वादाची सुनावणी 10 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. लेखक संजय दुधाणे यांनी आरोप केला आहे की त्यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकावर चित्रपटातील काही दृश्ये आधारित असून त्यासाठी त्यांची परवानगी घेण्यात आली नव्हती. दुधाणे यांनी 10 ऑक्टोबर 2024 रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे, निर्मात्या ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रॉडक्शन्स यांच्याविरोधात कॉपीराइटचा दावा केला होता.

कोर्टात वाद

1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये फ्री-स्टाइल कुस्टीत कांस्यपदक जिंकून भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर नागराज मंजुळे यांचा ‘खाशाबा’ हा चित्रपट आहे. मात्र या चित्रपटात आपल्या पुस्तकातील मजकूर परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा दावा संजय दुधाणे यांनी केला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहात ‘खाशाबा’चा टीझर प्रदर्शित केल्यामुळे नागराज मंजुळे यांच्यासह ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रॉडक्शनला नोटीस बजावण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी न्यायालयीने आयोगाने चित्रपट पाहावा आणि संजय दुधाणे यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकाचं वाचन करून निर्णय घेण्यात यावा, असा अर्ज वकील सुवर्णा शिंदे यांनी सादर केला आहे.

19 पुरावे न्यायालयात दाखल

खाशाबा चित्रपट हा संजय दुधाणे यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ पुस्तकावर आधारित असल्याचे 19 पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 5 पुरावे चित्रपटाच्या टीझरवरून, 4 पुरावे नागराज मंजुळे यांनी केलेल्या 5 कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीच्या दाव्यात, तर 6 पुरावे हे रणजीत जाधव यांच्याशी करार चित्रपटाच्या संदर्भातील आहेत. हे सर्व 14 पुरावे ॲड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयात दाखल केले आहेत.

लेखकांवर अब्रु नुकसानीचा दावा

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लेखक संजय दुधाणे यांच्यावर 5 कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्यातील शपथपत्रात कथा ही दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे पुरावे मंजुळे यांनी जोडल्याचा दावा संजय दुधाणे यांनी केला आहे. खाशाबा चित्रपट हा सोशल मिडियावरील माहिती आधारे निर्माण करत असल्याचं म्हणत नागराज मंजुळे यांनी शपथपत्र दाखल केलं होतं. मात्र मंजुळे यांनी जोडलेले 4 संदर्भ हे दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारीत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

खाशाबा चित्रपटाच्या टीझरमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, खाशाबांचे प्राचार्य, इंग्रज अधिकारी आणि बडोद्याचे माणिकराव, पंजाबी मल्लांवर झालेला अन्याय, कुस्तीसह मल्लखांब, खो-खोतील अष्टपैलू खेळाडू ही दृश्ये स्पष्टपणे दिसतात. हे सर्व आपण आपल्या पुस्तकात नाट्यमयरित्या लिहिल्याचा दावा लेखक दुधाणे यांनी केला आहे. हा निव्वळ योगायोग निश्चितच नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *