पुणे : मुंबईसह पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू असून वाहतूकव्यवस्था कोलडमडल्याचं दिसून येत आहे. पावसामुळे लोणावळा (Lonavala) आणि मावळ तालुका परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत आदेश लागू केले आहेत. कलम 163 म्हणजे पर्यटनावर बंदी नसून पर्यटकांसाठी (Tourist) सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध लावण्यात आलेत. 6 जुलै रात्री 12 वाजल्यापासून 31 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्यामुळे, आता लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी किंवा धोकादायक पॉईंटवर जाता येणार नाही. तसेच, अशा ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे किंवा व्हिडिओग्राफी, रिल्स बनवणे बंधनकार करण्यात आलंय.
लोणावळ्यातील एकवीरा देवी, भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग किल्ला आणि इतर पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. मात्र, अतिवृष्टीमुळे अपघातांचा धोका वाढल्याने प्रशासनाने हे निर्बंधांचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, पावसाळ्यातील पर्यटनाचा आनंद घेताना जीव धोक्यात घालू नका, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पर्यटकांवर कोणते निर्बंध लावण्यात आलेत?
– 6 जुलै मध्यरात्री ते 31 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत 163 कलम लागू
– धबधबे, ओढे, नदी, धरणात उतरण्यास बंदी
– धोकादायक कड्यांवर सेल्फी, व्हिडिओ शूटिंगला मनाई
– नैसर्गिक धबधब्यांमध्ये प्रवेशास बंदी
– मद्यपान, ध्वनीप्रदूषण, कचरा टाकण्यास बंदी
– महिलांची छेडछाड, बेजबाबदार वाहनचालकांवर कारवाई
– धरण आणि नदीकाठ परिसरात चारचाकी आणि सहाचाकी वाहनांना प्रवेशबंदी
लोणावळा–कर्जत घाट विभाग रेल्वे अपडेट
लोणावळा–कर्जत दक्षिण-पूर्व घाट विभागातील मंकी हिल आणि खंडाळा स्थानकांदरम्यान १२१ व १२३ कि.मी. परिसरात युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
दरड कोसळल्याने रेल्वे रुळांवर आलेला मातीचा ढिगारा, दगड आणि मोठे खडक हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.
रेल्वेचे अभियांत्रिकी विभाग, कर्मचारी आणि यंत्रसामग्रीच्या मदतीने मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कामात अडथळे येत असले तरी सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून काम सुरू आहे.
मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा