शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या, मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबई महानगर पालिकेच्या महापौर कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना झापल्याची घटना घडली आहे. आम्ही पत्रे लिहिलीत त्याची उत्तरे का दिली जात नाहीत असा जाब त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारला आहे. यावरुन नंतर महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्ष नेत्या किशोरी पडणेकर यांच्या फोनवरुनही वाद झाल्याचे म्हटले जात आहे.
आपल्या दिलेल्या पत्रांना उत्तर दिले जात नसल्याने विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर दालनात कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की पत्रं दिलं त्याची उत्तर का नाहीत ? तुमची मज्जा सुरू आहे.MS नाही, ऑपरेटर जागेवर नाही काय सुरू आहे ?अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी कर्मचाऱ्यांना झापलं आहे.
पावसाळ्याच्या अनुषंगाने विशेष सभेचं नियोजन व्हावे यासाठी स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे सह इतर ४ सदस्यांच्या सह्यांचे पत्र महापौर कार्यालयात देऊनही उत्तरं मिळत नाही. याबाबत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त करीत महापौर दालनात असलेल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी थेट अधिकाऱ्यांची कामे त्यांना सांगत चांगलेच सुनावले आहे. यावेळी महापौर दालनात नसल्याने त्यांची भेट मात्र झाली नाही.
फोनवरुन शाब्दीक वाद…
हा प्रकार घडताच पेडणेकरांना महापौर रितू तावडे यांनी फोन केला. माझ्या कार्यालयात येऊन असे करणे योग्य नाही अशी भूमिका महापौर रितू तावडे यांनी मांडली. यावर उत्तर देत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की मी तुमच्या दालनात आलेली नाही बाहेर असलेले कर्मचारी कार्यालय हे सगळ्यांसाठी खुले आहे. ते काम करीत नव्हते, त्यांना उत्तर विचारण्यात आले. यावरून महापौर आणि विरोधी पक्षनेत्या यांच्यात वाद सुरू झाला.