Mumbai News: ‘3 तास खोटं बोलले, मग वाशीला पाठवलं…’, ऐरोली मनपा रुग्णालयाच्या ‘त्या’ डोसमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; मृत गर्भवती सोनम डोंगरेंच्या पतीने मांडली व्यथा


मुंबई : नवी मुंबईतील ऐरोलीच्या शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेचा (pregnant women) मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या गर्भवती महिलेची  (pregnant women) प्रकृत गंभीर आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे (sonam dongre) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच दुसऱ्या गर्भवती रिचा मिश्रा यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघींची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना ऐरोली मनपा रुग्णालयातून वाशी येथील मनपा संदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले. इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे.(Mumbai News)

सोनम डोंगरे यांचे पती करण डोंगरे यांनी याप्रकरणी माध्यमांशी बोलताना म्हटलं की,  “आम्ही सोनमला प्रसूतीसाठी ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला कोणता तरी चुकीचा डोस दिला, ज्यामुळे तिची तब्येत अचानक बिघडली. आम्ही विचारणा केली असता, डॉक्टर आम्हाला तब्बल तीन तास तिथेच थांबवून ठेवून ‘तिची तब्येत व्यवस्थित आहे’ असे खोटे सांगत राहिले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांनी तीन तासांनी तिला वाशी येथील महापालिका रुग्णालयात हलवण्यास सांगितले. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा वाशीतील डॉक्टरांनी काही वेळातच सोनम आणि पोटातील बाळाला मृत घोषित केले. ऐरोलीतील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे”, असा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे. (pregnant women)  

त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, एकच्या सुमाराच एक इंजेक्शन माझ्या बायकोला दिलं होतं. इंजेक्शन दिल्या दिल्या माझी बायको जागेवरतीच बेशुध्द पडली आणि त्यांनी आम्हाला फक्त बाहेर येऊन सांगितले की, तुमची बायको बेशुध्द पडली, आम्ही सैरभर झालो होतो, आतमध्ये येण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतो, पण त्यांनी आम्हाला अजिबात आतमध्ये सोडलं नाही, बोलले की, नॉर्मल डिलीवरीमध्ये म्हणजे होतं असतं असं, एका दोन पेशंटला होतंच हे. हे नॉर्मल आहे, तुम्ही काळजी करायचं कारण नाही असे त्यांनी बोलले आणि जवळजवळ तीन तास माझ्या बायकोला त्यांनी आतमध्ये काय ट्रीट केलं, मला काहीच खबर नाही, त्यांनी मला आतमध्ये सोडलं नाही, मी त्यांना वारंवार बोलत होतो की, मी तिला दुसरीकडे हलवतो माझ्या बायकोला मी दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेऊन जातो, पण त्यांनी मला अजिबात रिस्पॉन्स दिला नाही, उडवाउडवीचे उत्तर दिली आणि मला आतमध्ये नातेवाईकांना मला दोघांना पण आतमध्ये जाऊ दिलं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Mumbai News : चुकीचा डोस दिल्यामुळे दोघांचा मृत्यू

 गर्भवती सोनम डोंगरे यांचं पार्थिव ताब्यात घेण्यास नातेवाईकांकडून नकार देण्यात आला आहे. त्याचबरोबर पोस्टमार्टम पालिका रुग्णालयात न करता मुंबईतील रूग्णालयात करण्याची मागणी केली आहे. चुकीचा डोस दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने डॅाक्टरवर डबल मर्डर केस लावण्याची पती आणि नातेवाईकांची मागणी आहे, तर सोनम डोंगरे यांच्या उपचारादरम्यान पत्नीला भेटू दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोनम डोंगरे आणि त्यांच्या बाळाचा उपचारा दरम्यान काल(बुधवारी, ता १) मृत्यू झाला होता, तर दुसरी गरोदर महिला रिचा मिश्रा यांची प्रकृती चिंताजनक आहे, सद्या त्या व्हेंटिलेटरवर आहेत. या घटनेप्रकरणी शिवसेना आणि मनसेकडून महानगरपालिका रूग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai News : आरोग्याशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही

नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही. न्याय मिळालाच पाहिजे अन्यथा मनसे आरोग्य विभागाच्या अधिकारी ह्यांच्या कार्यलयाची एकही काच शाबूत ठेवणार नाही, असा इशाराच मनसेचे नेते गजानन काळे यांनी दिला आहे. गजानन काळे यांनी म्हटलंय की, अतिशय संतापजनक घटना, नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे ८ महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच दुसऱ्या गर्भवती रिचा मिश्रा यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघींची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना ऐरोली मनपा रुग्णालयातून वाशी येथील मनपा संदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले. इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे. या दाव्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. गेली अनेक वर्षे नवी मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर त्याची जबाबदारी कोणाची ह्याचे उत्तर नवी मुंबईकरांना मिळालंच पाहिजे . या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष तपासणी व्हावी अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *