‘तारक मेहता’ यांच्या लेकीचं लग्न; तुफान नाचले शैलेश लोढा, पहा व्हिडीओ – Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah shailesh lodha daughter swara lodha wedding actor dance tmkoc


शैलेश लोढा यांच्या मुलीचं लग्नImage Credit source: Instagram

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा सध्या त्यांच्या मुलीच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. शैलेश यांनी काही वर्षांपूर्वीच या मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र आजही ते ‘तारक मेहता’ म्हणूनच चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांची मुलगी स्वरा लोढाचा नुकताच थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लाडक्या लेकीच्या लग्नात स्वत: शैलेश लोढा यांनी गाणी गायली आहेत. लोकप्रिय सुफी आणि बॉलिवूड गायक कैफ साबरी यांनीसुद्धा स्वराच्या लग्नात परफॉर्म केलं. त्यांनी स्वराच्या लग्नातील काही व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या व्हिडीओमध्ये शैलेश लोढा हे कैफ यांच्यासोबत ‘तेरे जैसा यार कहाँ’ हे गाणं गाताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी मुलीच्या लग्नात बॉलिवूड गाण्यांवर ठेकाही धरला. निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या पायजमामध्ये ते अत्यंत अनोख्या अंदाजात दिसले. शैलेश लोढा यांची लोकप्रियता प्रचंड असली तरी त्यांची मुलगी स्वरा कायम प्रकाशझोतापासून दूर राहिली. स्वरा तिच्या खासगी आयुष्याविषयी सोशल मीडियावर फारशी व्यक्त झाली नाही. आई-वडिलांप्रमाणेच स्वरासुद्धा एक लेखिका आहे.

शैलेश लोढा यांचा व्हिडीओ-

स्वराने आई डॉ. स्वाती लोढा यांच्यासोबत ’54 रिझन्स व्हाय पॅरेन्ट्स स्टक’ या पुस्तकाचं सहलेखन केलं आहे. शैलेश लोढा यांचा जावई कोण आहे याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये शैलेश लोढा यांच्या चेहऱ्यावर लेकीच्या लग्नाचा आनंद सहज पहायला मिळत आहे. कैफ साबरी यांनी शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये स्वरा तिच्या पतीसोबत लग्नाचे विधी पार पडताना दिसत आहे.

पहा व्हिडीओ-

निर्मात्यांसोबत झालेल्या काही वादानंतर शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडली होती. एका मुलाखतीत ते याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले होते. निर्माते असित मोदी यांनी अत्यंत वाईट वागणूक दिली आणि अपमान केल्याचा आरोप शैलेश यांनी त्या मुलाखतीत केला होता. 2022 मध्ये त्यांनी निर्मात्यांना ई-मेल करून सांगितलं की ते यापुढे मालिकेत काम करणार नाहीत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *