Hardik Pandya IPL Trade Update In Marathi : आयपीएल 2027 च्या हंगामाची तयारी आतापासूनच सुरू झाली असून क्रिकेट जगतात खेळाडूंच्या ट्रेडिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. आयपीएल 2026 चा हंगाम संपल्यापासूनच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो, अशा बातम्या येत होत्या. मात्र, आता समोर आलेल्या एका नवीन रिपोर्टने सर्वांनाच थक्क केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एक-दोन नव्हे तर तब्बल सात आयपीएल फ्रँचायझी हार्दिक पांड्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी उत्सुक आहेत.
‘या’ 7 संघांची नजर हार्दिक पांड्यावर
आयपीएल 2026 नंतर हार्दिक पांड्या पुढील हंगामात नव्या जर्सीत दिसण्याची शक्यता बळावली आहे. सुरुवातीला हार्दिकची चेन्नई सुपर किंग्स (CSK) किंवा लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सोबत चर्चा सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु, ताज्या माहितीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) वगळता उर्वरित सर्व 7 फ्रेंचाईझी हार्दिकला खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. अर्थात, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
हार्दिक पांड्या एक चॅम्पियन कर्णधार…
हार्दिक पांड्या हा आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. 2022 मध्ये गुजरात टायटन्सने (GT) त्याच्यावर विश्वास दाखवत कर्णधारपद सोपवले होते. पहिल्याच हंगामात हार्दिकने आपल्या नेतृत्वाची चमक दाखवत गुजरातला जेतेपद मिळवून दिले. त्यानंतर 2023 च्या हंगामातही त्याने संघाला फायनलपर्यंत पोहोचवले.
2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिककडे नेतृत्व सोपवले. मात्र, मुंबईत त्याचा कर्णधारपदाचा कार्यकाळ चढ-उतारांचा राहिला. 2024 मध्ये संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही, 2025 मध्ये प्लेऑफपर्यंत मजल मारली, पण 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आणि संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर फेकला गेला. असे असूनही, हार्दिकची अष्टपैलू क्षमता पाहता त्याची मागणी बाजारात प्रचंड आहे.
बंगळुरूमध्ये होणार शिफ्ट; घेतला ऐतिहासिक निर्णय
हार्दिक पांड्याने तंदुरुस्ती राखण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो आता मुंबई सोडून बंगळुरूमध्ये स्थायिक होत आहे. बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (NCA) ला त्याने आपले स्थायी ट्रेनिंग बेस बनवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून दुखापतींशी सामना करणाऱ्या हार्दिकला आता जागतिक दर्जाच्या वैद्यकीय आणि रिहॅबिलिटेशन सुविधांचा नियमित लाभ घ्यायचा आहे. मुंबईतून वारंवार बंगळुरूला ये-जा करणे कठीण होत असल्याने त्याने हा निर्णय घेतला. नॅशनल क्रिकेट अकादमीच्या या सेंटरला आपले स्थायी घर बनवणारा हार्दिक हा भारताचा पहिला सक्रिय क्रिकेटपटू ठरला आहे. आता 2027 च्या लिलावात किंवा ट्रेडिंग विंडोमध्ये तो कोणत्या संघात जातो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला