टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची आज 1 जुलैपासून सुरुवात होत आहे. उभयसंघात टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ही 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेने होणार आहे. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा चेस्टर ली स्ट्रीटमधील रिव्हरसाईड स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा हा या मैदानातील पहिलाच टी 20i सामना असणार आहे. त्यामुळे भारताची या मालिकेत विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे हा सामना रद्द होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने मैदानात आणि आसपासच्या परिसरात सामन्यादरम्यान पावसाचा किती अंदाज आहे? हे जाणून घेऊयात.
इंग्लंडमध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मात्र हवामान लहरी आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. उभयसंघातील पहिल्या सामन्यावर पावसाची टांगती तलवार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पावसाची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड होण्याची दाट शक्यता आहे.
इंग्लंड-इंडिया पहिल्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 10 तर स्थानिक वेळेप्रमाणे 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. बीबीसी वेदरनुसार, चेस्टर ली स्ट्रीटमध्ये संध्याकाळी 5 नंतर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार 5 नंतर पावसाची शक्यता 43 टक्के आहे. तसेच 6 ते 8 दरम्यान पावसाचा अंदाज हा 66 टक्के इतका आहे. त्यानंतर रात्रभर पावसाचा अंदाज हा 44 ते 45 टक्के इतका आहे. तर भारतीय वेळेनुसार सामना रात्री 10 ते 2 दरम्यान होणार आहे. त्यामुळे पाऊस सामन्याची मजा घालवणार असंच चित्र आहे.
टीम इंडियाचे दोन्ही सामने रद्द
दरम्यान टीम इंडियाचे रिव्हरसाईड स्टेडियममधील दोन्ही एकदिवसीय सामने हे रद्द झाले आहेत. या मैदानात भारताचे 2002 आणि 2011 साली सामने आयोजित करण्यात आले होते. मात्र पावसाने खेळ होऊ दिला नाही. त्यामुळे आता टीम इंडियाचा या मैदानातील तिसरा सामनाही पावसामुळे रद्द होणार की टीम इंडिया विजयी सलामी देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.