नांदेड : राज्यातील खासदार फुटीनंतर (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी (Shivsena) सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त केल्याचं दिसून आलं. ठाकरेंच्या सहा खासदारांनी अचानक उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवधनुष्य हाती घेतलं. त्यानंतर, या सहाही खासदारांच्या मतदारसंघात त्यांना सर्वसामान्य जनतेच्या टीकेचा सामना करावा लागला. तर, उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्या मतदारसंघात जाऊन जोरदार हल्लाबोल केला. दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) या सहा खासदारांना बळ देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज नांदेड दौऱ्यात श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर, संबंधित शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी फोन करुन शाबासकी दिली.
नांदेड जिल्ह्यात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदेंनी हजेरी लावली. त्यावेळी, यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. काळे झेंडे आंदोलनानंतर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांची माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून विचारपूस केली. येथील ग्रामीण जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्याशी संवाद साधत त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि, “तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला कुठलाही धोका नाही, काही अडचण असल्यास मला सांगा,” असा विश्वास दिला.
उद्धव ठाकरेंच्या फोनमुळे उत्साह
उद्धव ठाकरेंचा फोन आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला, यावेळी कार्यकर्त्यांनीही आजीवन आपल्यासोबत राहण्याची ग्वाही दिली. तसेच, पुढील टप्प्यात किनवट दौऱ्यावर येणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी मोबाईल कॉलद्वारे कार्यकर्त्यांना सांगितले. सध्या जिल्ह्यात आजच्या काळे झेंडे आंदोलनाची आणि उद्धव ठाकरेंच्या फोनची जोरदार चर्चा सुरू आहे.
आत्मपरिक्षण करा, लोक तुम्हाला सोडत आहेत
एकनाथ शिंदे साहेबांशी जो जोडला तो मोठा झालाय, 40 चे 60 आमदार झाले, 6 चे 13 खासदार झाले. नागेश पाटील आष्टीकर तिकडे होते तेव्हा सभेला जागा पुरत नव्हती, आता आष्टीकर आमच्याकडे आले की छोट्या हॉलमध्ये रडारड केली, असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी नांदेडमधून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. श्रीकांत शिंदेंनी नांदेड दौऱ्यात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिंदे साहेबांनी शेतकरी, लाडक्या बहिणींचा विचार केला, तुम्ही अडीच वर्षे घरात बसून राहिलात, कोणाला काहीच दिलं नाही. म्हणून लोक तुम्हाला सोडत आहेत, तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा, तो गेला तर मला काही फरक पडत नाही म्हणत म्हणत त्यांचं दुकान रिकामं झालं, आम्ही घरात बसुन फुशारक्या मारत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली.
हेही वाचा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह