‘त्याला खेळायला जायचंय, तो येईल…’, झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई हातात बॅट धरून पाहतेय विहानची वाट | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

मुंबईच्या चेंबुर भागामध्ये शाळेतून घरी जाताना स्कुल बसवर झाड कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर 10 मुलं गंभीर जखमी झाली.

News18
News18

मुंबई : मुंबईच्या चेंबुर भागामध्ये शाळेतून घरी जाताना स्कुल बसवर झाड कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर 10 मुलं गंभीर जखमी झाली. चेंबुर येथील 11 नंबर रोडवरून स्कुल बस विद्यार्थ्यांना घेऊन घरी जात होती, तेव्हाच पिंपळाचं जुनं झाड बसवर कोसळलं, ज्यात या मुलाचा मृत्यू झाला आहे. दुपारी 2 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास चेंबुरमधील रोड क्रमांक 11 वरची युनिव्हर्सल शाळा, टिळक नगर शाळेच्या बसवर हे झाड कोसळलं.

मृत्यू झालेल्या मुलाची आई मात्र अजूनही धक्क्यात आहे. घटनेच्या अनेक तासांनंतर मुलाची आई त्याची क्रिकेटची बॅट हातात धरून बसली आहे. विहान परत येईल, कारण त्याला क्रिकेट खेळायला जायचं आहे, असं त्याची आई वारंवार म्हणत आहे, असं विहानच्या शेजारी राहणाऱ्यांनी सांगितलं. आईसाठी विहान हेच सर्वस्व होतं, ती कायमच विहानबद्दल चिंता करत राहायची, असंही शेजाऱ्यांनी सांगितलं.

कसा झाला अपघात?

मुंबईच्या चेंबुर भागामध्ये दुपारी 2 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास रोड नंबर 11 वर एका इमारतीच्या जवळ युनिव्हर्सल हायस्कूलची बस 13 विद्यार्थ्यांना घेऊन जात होती, तेव्हाच बसवर झाड कोसळलं. फायर ब्रिगेड आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी बसमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढलं. बस ड्रायव्हर आणि स्थानिक लोकांनी बचाव कार्यात मदत केली. अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचं वय 4 ते 12 वर्ष होतं. अपघातानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रुग्णालयातल्या मेडिकल ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार गंभीर जखमी झालेल्या 11 वर्षांच्या विहान श्रीवास्तवला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर इतर 4 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. महापौर कार्यालयातील स्थानिक अधिकाऱ्यांनी परिसरातल्या झाडांची छाटणी करण्यात आली होती, असं सांगितलं आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

‘त्याला खेळायला जायचंय, तो येईल…’, झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई हातात बॅट धरून पाहतेय विहानची वाट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *