उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी या खासदारांच्या मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. त्यांचा पहिला दौरा यवतमाळ येथून सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यावर खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे देखील असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यवतमाळ येथे जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एका खासदाराची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. या क्लिपमध्ये हा खासदार काय म्हणाला हे ऐकून अनेकजण चकीत झाले आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे सुरुवातीला म्हणाले, पहिलं गद्दारांचा समाचार घेतो. कारण हे गद्दार काही वेळेला माझी चूक होती. माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला बुजगावणं दिलं. त्याला रक्ताचं पाणी करून, समोरून पावसाचा धबधबा पडत होता तरी कशाची तमा न बाळगता निवडून दिलं. त्याबद्दल तुमची माफी मागतो. मतदारांची माफी मागतो. तुम्ही शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझ्या शब्द या भरवश्यावर गद्दाराला निवडून दिलं. त्याने गद्दारी करून विश्वासाला काळं फासलं. त्याचा जाब विचारलं पाहिजे. शेवटी गद्दारच. गद्दाराच्या कळपात गेला. गद्दार शिरोमणी मिंधे याने ४० आमदार फोडले. बैल पोळ्यात बैलावर लिहिलं होतं ५० खोके एकदम ओके. आता खासदारांचा किती भाव असेल. हा धंदा झाला. निवडून यायचं आणि हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं.
थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली आणि म्हणाले, आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन हे गद्दारी करणार असतील तर खरोखर आईला काय वाटेल. चूक आपल्या सर्वांची झाली. याने पूर्वी एकदा गद्दारी केली होती. तरी परत आले. टेपमध्ये ऐकलं असेल, शिवसेनेवर संकट येऊच शकत नाही. तुझी काळजी कर. माझी करू नको. शिवसेना चोरली, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे. तुम्ही शिवसेना चोरल्यावर हक्काचे नऊ खासदार निवडून आणले. ती फोडण्याची वेळ का आली? तेव्हा म्हणत होते १८ खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. आम्ही महाविकास आघाडीचे ३१ खासदार छाताडावर बसवले होते. कुठे गेली मोदींची लाट. दोन वर्षात हे लोकसभेत किती वेळा हजर होते. आंदोलने काय केली. जी आंदोलने आपण केली, मी काही उपकार नाही केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. कोणी मागितील नव्हती आपण मुक्ती दिली. सर्व म्हणतात मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मग निष्ठेला जाग ना.
पुढे ते म्हणाले, यांची फसवणूक करण्याची गद्दारी वृत्ती आहे. एसआयआर सुरू होत आहे. रेशन कार्ड, पॅनकार्ड… आता पासपोर्ट नागरिकत्व ठरवणार नाही. मग काय भाजपचं सदस्यत्व गृहित धरणार. आम्ही नाहीये भाजपचे सदस्यत्व. हा भाजप नाही. असाच वागला तर हा पाकिस्तान जनता पक्ष होतोय का अशी चिंता वाटत आहे.