Last Updated:
Nana Patekar On Vijaya Mehta : नाना पाटेकर त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आईसह तीन महिला आईच्या जागेवर होत्या. त्यापैकी एक विजया मेहता. ज्यांच्या 91 व्या वाढदिवशी नानांनी त्यांची भेट घेतली होती. ही भेट त्यांची शेवटची भेट ठरली. नानांना मोठा धक्का बसला आहे.
“या आयुष्यात आई गेली, आज पुन्हा एकदा पोरके झाल्यासारखे वाटते आहे, बाईंच्या जाण्याने सगळे काही संपलं…” नाना पाटेकर यांचे हे शब्द… दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांच्या जाण्याने नाना पूर्णपणे खचले आहे. सख्या आईनंतर नाना विजया मेहता यांनाही आई मानायचे. पण आता त्याही या जगात राहिल्या नाहीत. त्यामुले नाना कोलमडले आहेत.
विजया मेहता या आधुनिक मराठी रंगभूमीवरील एक अत्यंत मानाच्या आणि अग्रगण्य अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्मात्या होत्या. मराठी नाट्यविश्वात त्यांना आदराने ‘बाई’ म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाटकाच्या मुशीतून नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, अशोक सराफ यांच्यासारखे अनेक दिग्गज कलाकार घडले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने कित्येक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यापैकीच एक नाना पाटेकर.
4 नोव्हेंबर 2025 रोजी विजयाबाईंचा 91 वा वाढदिवस होता. तेव्हा नानांनी भारती आचरेकर यांच्यासोबत त्यांची भेट घेतली होती. नानांनी दादर मार्केट मधून खोली भरेल एवढी असंख्य प्रकारची फूलं आणली होती आणि विजयाबाईंच्या घरातील जवळफास 20 फ्लॉवरपॉटमध्ये ती सुरेखरित्या लावल्याचं भारती यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं होतं.
आता 6 महिन्यांनंतर त्यांच्या निधनाची बातमी ऐकून नानांना मोठा धक्का बसला आहे. नाना म्हणाले, “अगदी अलीकडे त्यांच्या वाढदिवसाला झालेली भेट ही शेवटची ठरली. त्यांच्या निधनाची वार्ता देण्यासाठी त्यांच्या मुलीचा फोन आला तेव्हा ते ऐकून माझी अवस्था धक्का बसण्यापलीकडची होती. बाईंच्या जाण्याने सगळं काही संपलं, अशीच माझी भावना आहे.”
“माझ्या आयुष्यात तीन स्त्रियांना आईचं स्थान होतं. एक माझी जन्मदात्री आई, दुसऱ्या सुलभा देशपांडे आणि तिसऱ्या विजयाबाई. मी आयुष्यात जे काही केले ते या तिघींमुळे. या आयुष्यात आई गेली. विजया मेहतांचं जाणं हे आई गमावण्यासारखंच आहे. सुलभाताई गेल्या तेव्हा पोरके झाल्याची भावना होतीच. आज पुन्हा एकदा पोरकं झाल्यासारखं वाटतं आहे.”, असं नाना म्हणाले.
नाना पुढे म्हणाले, “आईने जन्म दिला, पण अभिनयाच्या क्षेत्रामध्ये जे काही शिकलो ते विजयाबाईंनी शिकवले. खरं म्हणाल तर मातीच्या गोळ्याला त्यांनी आकार दिला.मला अभिनयामध्ये जे काही येतं ते त्यांच्यामुळेच येतं. रंगमंचावर कसं उभं रहायच इथपासून ते प्रेक्षकांच्या मनाचा ठाव कसा घ्यायचा, नाटकाच्या गाभ्यापर्यंत कसं पोहोचायचं हे बाईंनी ठरवले. माझ्याकडे अभिनयाचं जे काही आहे ते त्यांनीच दिलेलं आहे.”
गुजरातच्या बडोद्यात जन्मलेल्या विजया मेहता यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांनी दिल्लीत विख्यात रंगकर्मी इब्राहिम अल्काझी आणि मुंबईत आदि मर्झबान यांच्याकडे अभिनयाचे आणि नाट्यशास्त्राचे रीतसर शिक्षण घेतलं होतं. 1960 च्या दशकात त्यांनी प्रायोगिक आणि समांतर रंगभूमीची चळवळ उभी करण्यात मोलाचं योगदान दिलं. नाटककार विजय तेंडुलकर, अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासोबत मिळून ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली. या संस्थेने मराठी नाट्यसृष्टीला व्यावसायिक साच्यातून बाहेर काढून एका नव्या प्रायोगिक वाटेवर आणलं. विजयाबाईंना रंगभूमीवर कडक शिस्तीसाठी ओळखलं जायचं.
एक शून्य बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, बॅरिस्टर, शाकुंतल, हमीदाबाईची कोठी, वाडा चिरेबंदी, पुरुष, हयवदन ही त्यांची काही गाजलेली नाही. त्यांनी फक्त नाटकच नव्हे, तर चित्रपट क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिलं. ‘रावसाहेब’, ‘पे्स्तनजी’ या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. तसंच ‘पार्टी’ ‘कलियुग’ (१९८१) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘स्मृतिचित्रे’ ही दूरचित्रवाणी मालिका आणि ‘लाइफलाइन’ ही मालिका अत्यंत गाजली. विजयाबाईंनी ‘झिम्मा’ झिम्मा आठवणींचा गोफ हे आपले आत्मचरित्र लिहिलं होतं.
Jul 01, 2026 11:29 AM IST
