Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: प्रियकराने तिच्यासह होणाऱ्या बाळाची जबाबदारी स्वीकारण्याचे आणि लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्याच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून पतीलाच घटस्फोट दिला.
छत्रपती संभाजीनगर: सहकाऱ्याशी झालेली मैत्री प्रेमात बदलली, त्या प्रेमासाठी विवाहित महिलेने स्वतःचा संसारही मोडला. दोन महिन्यांची गर्भवती असतानाच तिने पतीपासून घटस्फोट घेतला. प्रियकराने तिच्यासह होणाऱ्या बाळाची जबाबदारी स्वीकारण्याचे आणि लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्याच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने त्याच्यासोबत आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मात्र काही दिवसांनी प्रियकरानेच तिच्याशी संपर्क तोडला. चौकशी केली असता तो स्वतःही विवाहित असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव शाहिद कय्युम सय्यद (वय 27, रा. लक्ष्मी कॉलनी, शिवाजीनगर) असे आहे. 24 वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 2024 मध्ये ती क्रांतीचौक परिसरातील एका दुचाकी शोरूममध्ये नोकरी करत होती. त्याच ठिकाणी शाहिद सय्यद याच्याशी तिची ओळख झाली. काही दिवसांतच या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्या काळात पीडिता आपल्या पतीसोबत हर्सूल परिसरात राहत होती. मात्र या प्रेमप्रकरणामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद निर्माण होऊ लागले. त्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट होण्यापूर्वीच ते वेगवेगळे राहत होते.
फिर्यादीनुसार, पीडिता काही दिवस मैत्रिणीसोबत राहत असताना आरोपीने तिचा आणि होणाऱ्या बाळाचा सांभाळ करण्याचे आश्वासन दिले. “तुझ्या होणाऱ्या लेकराचा मी सांभाळ करतो, त्याला माझे नाव देतो, त्याला काही कमी पडू देणार नाही आणि तुझ्याशी लग्न करतो,” असे सांगून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, 1 डिसेंबर 2025 रोजी पीडितेचा पतीसोबत अधिकृत घटस्फोट झाला. त्यानंतर दोन महिन्यांनी पीडितेने एका मुलीला जन्म दिला. मुलगी दीड महिन्यांची झाल्यानंतर आरोपी पुन्हा तिच्या राहत्या ठिकाणी येऊ लागला. त्याने लग्नाचे आमिष दाखवत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपीच्या कुटुंबीयांना या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला शिवीगाळ करत पीडितेकडे जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर पीडितेने अधिक माहिती घेतली असता शाहिदचेही लग्न झालेले असल्याचे समोर आले. यानंतर तिने त्याच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच पीडिता किंवा तिच्या मुलीचीही विचारपूस केली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पीडितेने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.
Aurangabad,Maharashtra
Jun 27, 2026 10:36 AM IST
