Last Updated:
Maharashtra Onion Market Rates: कांद्याला मिळणाऱ्या कमी बाजारभावामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. कांद्याला मिळणारा दर उत्पादन खर्चही भागवू शकत नसल्याने शेतकर्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
मुंबई : कांदा लागणीसाठी बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं. एवढ्यावर न भागल्याने प्रसंगी कर्ज काढून लागण केली. परंतु आता जेव्हा कांदा विकण्यासाठी आलो तेव्हा लागवडीचा खर्च सुद्धा निघणार नाही, नफ्याची गोष्ट तर लांबच राहिली… सरकार आमची क्रूर चेष्टा करतंय… कांदा विकायला आणताना मी माझा मोबाईल घरी ठेवून आलोय. कारण घरचे लोक सारखे फोन करून कांद्याला भाव किती मिळाला याची विचारपूस करतात, त्यांना काय उत्तर देऊ… हे शब्द आहेत पारनेरच्या एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचे. त्याचे बोलणे ऐकून हृदय असलेल्या माणसाला नक्कीच पाझर फुटेल, सरकारला पाझर फुटेल की नाही माहिती नाही…!
सध्या कांद्याला मिळणाऱ्या कमी बाजारभावामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. कांद्याला मिळणारा दर उत्पादन खर्चही भागवू शकत नसल्याने शेतकर्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पाच-दहा रुपये किलोप्रमाणे शेतकर्यांकडून कांदा खरेदी केला जात आहे. त्यातून शेतकर्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत बाजारात कांदा विक्रीला नेणेही परवडत नाहीये. परंतु तरीही ‘आशा’ नावाची गोष्ट जिवंत ठेवून शेतकऱ्याचे पाय कृषि उत्पन्न बाजार समितीकडे वळतात. इथे आल्यावर कांद्याचे दर ऐकून शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आल्यावाचून राहत नाहीत. ‘बोल भिडू’ने यासंदर्भातील वृत्तांकन केले आहे.
कांद्याच्या लागवडीसाठी बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं…
अहमदनगर जिल्ह्यातील (आताच्या अहिल्यानगर) पारनेरच्या गणेश पवार नामे शेतकऱ्याने कांदा लागवडीसाठी बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवले. तेवढ्यावरही भागले नाही म्हणून त्याचे काही हजारांचे कर्ज काढले. कांदा विकून आपण सोनाराकडे गहाण ठेवलेले मंगळसूत्र सोडवून आणू, असे त्याने मनाशी ठरवले. त्यासाठी दर महिन्याला येणारे व्याज तो सोनाराकडे भरत राहिला. पण जेव्हा प्रत्यक्षात कांदा विक्रीला आणला, त्यावेळी त्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले होते. कांद्यातून नफा सोडा, गाडीभाडेही निघणे मुश्कील होते, हे त्याच्या लक्षात आले. दोन दिवसांपासून जेवणे केले नाही, असे त्याने सांगितले. कांदा विकण्यासाठी तो वाशीच्या मार्केटमध्ये आलेला होता.
“घरून निघताना मुद्दाम मोबाईल फोन आणला नाही कारण….”
“घरून निघताना मुद्दाम मोबाईल फोन आणला नाही. कारण बायको पोरगं सारखं फोन करून कांद्याला भाव किती मिळाला, याची विचारपूस करतं राहतं… उत्तर काय द्यावं हे कळत नाही. आता माझी शेती करण्याची हौस भागली आहे, यापुढे आता कधीच शेती करणार नाही. जर शेतीतून काहीच मिळणार नाही तर कशासाठी शेती करायची? आम्हाला नफा सोडा, आमचा उत्पादन खर्चही निघत नाही. आम्ही काय करावं? ” असा उद्विग्न सवाल तो सरकारला पर्यायाने व्यवस्थेला विचारत होता. त्याचा एक एक सवाल काळजाला भेगा पाडत होता. कांद्याने आमच्या जगण्याचा वांदा केला…. सरकारला हृदय असेल आणि संवेदना जाणणारे असेल तर कांदा प्रश्नी सरकार लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देईल, असे शेतकरी म्हणाला.
Mumbai,Maharashtra
लागणीसाठी बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं, पण कांद्याने जगण्याचा वांदा केला, सरकारला हृदय असेल तर स्टोरी ऐकून पाझर फुटेल!
