आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले


रत्नागिरी : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) आपल्या कडक स्वभावामुळे आणि आक्रमक शैलीमुळे सर्वपरिचीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामध्ये, नार्वेकर काय कोण लागून गेला आहे का? असे त्यांनी म्हटल्यावरुन वाद निर्माण झाला होता. तर, विधिमंडळ अधिवेशनातही त्यांचा आक्रमकपणा सभागृहात दिसून आला. आता, रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे दिशा समिती आणि रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या ऑनलाईन बैठकीची लिंक वेळत न मिळाल्याने भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला, तर सुनिल तटकरेंनाही (Sunil tatkare) सुनावलं. 

रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे दिशा समिती आणि रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीची लिंकच वेळेत न मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव तब्बल दोन तास ताटकळत राहिले. दुपारी 12 वाजता होणाऱ्या बैठकीची लिंक चक्क पावणेदोन वाजेपर्यंतही न मिळाल्याने दिशा समितीची बैठक संपून गेली. अखेर रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सहभागी होताच आमदार जाधव यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. 

आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? आम्हाला बैठक आहे हे कळवण्याचा साधा शिष्टाचारही नाही का? ही नेमकी कोणती कार्यपद्धती? असा खरमरीत सवाल भास्कर जाधव यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना केला. त्यानंतर, बैठकीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासमोरही त्यांनी या गंभीर हलगर्जीपणाचा जाब विचारला. एका लोकप्रतिनिधीला वेळेत बैठकीची लिंकही न पाठवता प्रशासनाने निष्काळजीपणाचा कळस गाठल्याची टीका त्यांच्याकडून करण्यात आली.

दरम्यान, भाजप नेते तथा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली होती. या भेटीनंतर रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

कोकणात पाऊस, 4 शेतकऱ्यांना वाचवले

तळकोकणात सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने घाटमाथ्यावर असलेल्या आंबोलीमधील नांगरतासवाडी येथे सकल पुलावरून पाणी वाहत आहे. तर, भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक पाणी आल्याने अडकले होते. सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगेली यांनी घटनास्थळी जात त्या चार शेतकऱ्यांना रेस्कू केले. पाण्यात उतरून अडकलेल्या चार शेतकऱ्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आल्याने सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.

हेही वाचा

राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *