Last Updated:
व्हॉट्सॲपवरून मुलींचे फोटो पाठवून ग्राहकांना आकर्षित करायचे. यानंतर ग्राहकांना कात्रजमधील लॉजवर बोलवलं जायचं आणि..
पुणे: पुण्यातील कात्रज परिसरात सुरू असलेल्या एका अत्यंत भयानक आणि धक्कादायक काळ्या धंद्याचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. व्हॉट्सॲपवरून मुलींचे फोटो पाठवून ग्राहकांना आकर्षित करायचे. यानंतर ग्राहकांना कात्रजमधील लॉजवर बोलवलं जायचं आणि मग लॉजमध्ये डांबून ठेवलेल्या तरुणींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घ्यायचा, असा हा संपूर्ण धक्कादायक प्रकार होता. पोलिसांनी रचलेल्या एका बनावट ग्राहकाच्या खेळामुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, दोन परराज्यातील पीडित तरुणींची नरकयातनेतून सुटका करण्यात आली आहे.
१६ जुलै २०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला एक अत्यंत गुप्त आणि खळबळजनक माहिती मिळाली. कात्रज भागातील एका लॉजमध्ये काही दलाल ग्राहकांच्या व्हॉट्सॲपवर महिलांचे फोटो पाठवत होते. “यातील मुलगी निवडा,” असे सांगून ग्राहकांकडून मुलगी पसंत केली जायची. मग त्यांना लॉजवर बोलवलं जायचं. या माहितीचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तात्काळ एक धाडसी प्लॅन तयार केला. पोलिसांनी दलालांना पकडण्यासाठी चक्क बनावट ग्राहक तयार केले आणि त्यांच्यामार्फत दलालांशी संपर्क साधला.
मुख्य दलाल तुकाराम मनाळे याने सांगितल्याप्रमाणे बनावट ग्राहकांना कात्रज येथील ‘किनारा लॉज’ येथे पाठवण्यात आले. दलालाने ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना खोलीत पाठवले. ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. इशारा मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने थेट लॉजच्या रूमवर धाड टाकली. खोलीचा दरवाजा उघडताच तिथे परराज्यातील दोन पीडित तरुणींना डांबून ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोन्ही तरुणींची सुटका केली असून त्यांच्या चौकशीनंतर मुख्य आरोपीचा खरा चेहरा समोर आला.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य दलाल तुकाराम दत्ता मनाळे (वय २२ वर्षे, रा. सध्या तीनहत्ती चौक, संभाजीनगर, धनकवडी, पुणे) याला रंगेहात अटक केली आहे. तुकाराम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या रॅकेटची पाळेमुळे कुठेपर्यंत पसरली आहेत, याचा शोध घेत आहेत.
Pune,Maharashtra
मोबाईलवर फोटो पाठवून मुलींंची निवड; मग.., कात्रजमधील लॉजच्या ‘त्या’ खोलीचा दरवाजा उघडताच पोलीसही हादरले
