Sonam Wangchuk Hunger Strike: पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शनिवारी (18 जुलै) जंतर-मंतरवरून हटवून तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल केले आहे. वांगचुक यांच्यासोबतच कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनाही पोलिसांनी ताब्यात (Detained) घेतले असून, दिपके यांनी स्वतः ‘एक्स’वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. या कारवाईनंतर दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, ज्यावर आता पोलिसांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
Delhi Police: हायकोर्टाचा आदेश आणि पोलिसांची कारवाई
सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून अचानक का हटवण्यात आले, यावर दिल्लीचे पोलीस उपायुक्त (DCP) सचिन शर्मा यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, दिल्ली हायकोर्टाच्या (High Court) निर्देशानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वांगचुक यांच्या बिघडत्या प्रकृतीचा विचार करून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत असताना काही आंदोलकांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे घटनास्थळी थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी संयम राखत सोनम वांगचुक यांना सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले. तसेच जंतर-मंतरवरील इतर आंदोलकांनाही ही जागा लवकरात लवकर आणि शांततेत रिकामी करण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
Sonam Wangchuk Hunger Strike: हायकोर्टाने नेमके काय म्हटले होते?
यापूर्वी 16 जुलै रोजी दिल्ली हायकोर्टाने केंद्र आणि दिल्ली सरकारला सोनम वांगचुक यांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते. कोर्टाने स्पष्ट केले होते की, “जर डॉक्टरांच्या मते वांगचुक यांना कोणत्याही वैद्यकीय मदतीची गरज भासली, तर सरकारने त्वरित योग्य पावले उचलावीत. प्रत्येक व्यक्तीचा जीव अनमोल असून त्याची सुरक्षा करणे ही सरकारची जबाबदारी आहे.”
Sonam Wangchuk Hunger Strike: 20 दिवसांचे उपोषण अन् 9 किलो वजन घटले
सोनम वांगचुक हे गेल्या 28 जूनपासून ‘नीट’ पेपर लीक (NEET Paper Leak) प्रकरणाच्या निषेधार्थ उपोषणावर (Hunger Strike) बसले होते. त्यांच्यासोबत कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले. गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांचे वजन तब्बल 9 किलोपेक्षा जास्त घटले आहे. डॉक्टरांनी इशारा दिला होता की, उपोषण असेच सुरू राहिल्यास त्यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर इजा पोहोचू शकते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी, शुक्रवारी (17 जुलै) सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. यामध्ये त्यांनी 20 जुलै रोजी होणाऱ्या CJP च्या संसद मार्चमध्ये नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. “लोकसहभाग हीच या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद आहे,” असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला