Last Updated:
Pune News: तपासादरम्यान तिच्या वहीमध्ये ‘सॉरी, मम्मी पप्पा’ असा एका ओळीचा संदेश लिहिलेला आढळल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे: पुण्यातील धनकवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. रिद्धी रवी केडिया असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रिद्धीचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना तोल जाऊन घडली की तिने आत्महत्या केली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीतमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (15 जुलै) या दिवशी नेहमीप्रमाणे कुटुंबातील सर्वजण रात्रीचे जेवण करून झोपले होते. गुरुवारी पहाटे रिद्धीच्या आजीला जाग आली असता ती घरात दिसली नाही. रिद्धीच्या आजीने ही माहिती घरातील इतर सदस्यांना दिली. रिद्धीची शोधाशोध सुरू झाली.
घराचा मुख्य दरवाजा आतून बंद आढळला. गॅलरीत एक स्टूल आढळल्याने कुटुंबीयांनी इमारतीखाली धाव घेतली असता रिद्धीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रिद्धीचा मोबाईल, पुस्तके आणि इतर काही महत्त्वाच्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.
तपासादरम्यान तिच्या वहीमध्ये ‘सॉरी, मम्मी पप्पा’ असा एका ओळीचा संदेश लिहिलेला आढळल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदेशाचा नेमका अर्थ काय आणि त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. रिद्धीचा मृत्यू तोल जाऊन पडल्याने झाला की अन्य काही कारण आहे, याचा तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.
Pune,Maharashtra
‘सॉरी, मम्मी पप्पा’, पुण्यात 12 वीच्या विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, रात्रीचं ‘ते’ दृश्य पाहून कुटुंबीयांचा आक्रोश
