मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?


पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) 17 जागांसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये, अनेक ठिकाणी पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत आपले अर्ज भरले. त्यामुळे, निवडणुकीत (Election) मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून पुढील दोन दिवसांत अंतिम निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. कारण, अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 जून रोजी संपुष्टात येत असून आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. दरम्यान, याच छाननीदरम्यान पुण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे (vikram kakde) यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला आहे. तर, सोलापुरात भाजप महायुतीच्या राजेंद्र राऊत यांच्याही उमेदवारी आक्षेप घेण्यात आला आहे. 

महायुतीमधील जागावाटपात पुणे आणि रायगडरत्नागिरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीने पुण्यातून संजय काकडे यांचे सुपत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली. मात्र, माजी आमदार सुनील टिंगरे यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र, विक्रम काकडे यांनाच पक्षाने एबी फॉर्म दिल्यामुळे त्यांचीच उमेदवारी अंतिम झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आहे. विक्रम काकडे यांनी पुणे महानगरपालिकेकडे असलेला कर भरलेला नाही, त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या शपथपत्रात केलेला नाही. त्यामुळे त्यांनी भरलेला अर्ज बाद ठरवण्यात यावा, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे. आता, याप्रकरणी जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, ज्या प्रॉपर्टी टॅक्सबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत, ती प्रॉपर्टी 4 वर्षापूर्वीच विक्रम काकडे यांच्याकडून विकण्यात आली आहे. सदर प्रॉपर्टीचे खरेदी खत हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करण्यात आल्याची माहिती विक्रम काकडेंच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

राजेंद्र राऊतांच्या उमेदवारीवरही आक्षेप

सोलापूर विधानपरिषदेत भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्जावरही आक्षेप घेण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रमेश बारसकर यांनी राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. राजेंद्र राऊत हे 2019-24 मध्ये आमदार असताना, त्यांनी शासकीय निवासस्थानचा वापर केला का? यासंदर्भातील माहिती लपवल्याचा आक्षेप आहे. तसेच, उमेदवारी अर्जात नावापुढे श्री लावणे आणि जन्मतारीख चुकीचे नमूद केल्याचा देखील आक्षेप बारसकर यांनी घेतला आहे. 

काँग्रेस मविआचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्याही उमेदवारी अर्जात नमूद असलेल्या सुचकाची सही बोगस असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. पंढरपूरचे नगरसेवक आणि सूचक असलेल्या नागेश भोसले यांनी हा आक्षेप घेतला घेतला आहे. या आक्षेपामुळे काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी वैध होणार की अवैध याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासमोर या हरकती संदर्भात सुनावणी झाली लवकरच निर्णय होईल. 

राष्ट्रवादीची विक्रम काकडेंना उमेदवारी

राष्ट्रवादीने विक्रम काकडेंना उमेदवारी दिली याबाबत सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यांच्या गटात काय चाललंय मला माहित नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, वाढत चाललेले पेट्रोल डिझेलचे भाव हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा गट कसा चालतो हे मी पाहत नाही आणि ते पाहायला वेळ कमी मिळतो. काही लोकांचे अश्विनी ठेवीवर पाहिले त्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये बोलण्याचा मला अधिकार नाही. माणुसकीच्या नात्याने प्रत्येक पक्षाने काय आणि कोणाला काय द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण, ज्या लोकांनी संघर्ष केला त्यांना दुखवून निर्णय घेण्याचं कारण नाही. मी त्या लोकांबरोबर काम केलं आहे, अतिशय कर्तृत्ववान लोक आहेत, कष्ट करणारे देखील ते लोक आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

हेही वाचा

समृद्धी महामार्गावर अचानक भेटले, सत्तार-दानवेंची गळाभेट, विधानपरिषद निवडणुकीचं राजकारण बदलणार?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *