मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू


मुंबई : राजधानी मुंबईत (Mumbai) गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरातही पावसामुळे नदी, नाले भरुन वाहत आहेत. तर, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळीही वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची धरणस्थिती जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर आणि तानसा धरणे (Dam) 100 टक्के भरली असून दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे, धरणांच्या खालच्या प्रवाहातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मोडकसागर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाची पातळी 163.174 मीटर इतकी आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून सुमारे 18,933 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासांत धरण परिसरात 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तानसा धरण देखील 100 टक्के भरले असून धरणातील गेट क्रमांक 19 उघडण्यात आला आहे. या धरणातून सुमारे 20,999.94 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात गेल्या 24 तासांत 79 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, मध्य वैतरणा धरण अद्याप 70.48 टक्के भरले असून, धरणाची पातळी 275.18 मीटर आहे. या धरणाचे सर्व दरवाजे सध्या बंद असून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. मात्र गेल्या 24 तासांत या धरणाच्या पाण्याच्या पातळीत 3.08 मीटरची वाढ झाली असून परिसरात 144 मिमी पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी तसेच पर्यटकांनी नदीपात्र, पूल आणि धरणांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

खडकवासला धरणातून विसर्ग

पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमध्येही झपाट्याने वाढ होत असून  पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज ठीक रात्री 8 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात 3825 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाकडून करणयात आलंय. 

नाशिकमध्ये रामसेतू पुल पाण्याखाली

नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. रामकुंड परिसरातील सर्व मंदिरा पाण्याखाली गेली असून राम सेतू पूल देखील पाण्याखाली गेला आहे. याच रामसेतू पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना एक नागरिक जीव धोक्यात घालून पूलावरून जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक जीव धोक्यात घालत स्टंटबाजी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडेल अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा

नाशिककरांनो काळजी घ्या! गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; संध्याकाळपर्यंत नदी धोक्याची पातळी ओलांडणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *