OTT webseries: ‘अल्फा’ चित्रपटानंतर अभिनेत्री शर्वरी वाघच्या जुन्या कामांची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेली तिची देशभक्तीवर आधारित वेबसीरिज ‘द फॉरगॉटन आर्मी: आझादी के लिए’ सध्या सोशल मीडियावर आणि ओटीटी प्रेक्षकांमध्ये पुन्हा चर्चेत आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या शौर्यगाथेवर आधारित ही वेबसीरिज दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय आणि भव्य युद्धदृश्यांमुळे आजही प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे.
आझाद हिंद सेनेच्या संघर्षाची कहाणी
दिग्दर्शक कबीर खान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ‘द फॉरगॉटन आर्मी: आझादी के लिए’ ही वेबसीरिज भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेला इतिहास उलगडते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाली होती.
या वेबसीरिजमध्ये सनी कौशल यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह सोढी यांची भूमिका साकारली आहे. तर शर्वरी वाघ ही माया श्रीनिवासन या आझाद हिंद सेनेतील महिला ब्रिगेडच्या सदस्याच्या भूमिकेत दिसते. देशभक्ती, धाडस आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम असलेली तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सनी कौशल आणि शर्वरी यांची प्रेमकथाही या मालिकेतील महत्त्वाचा भाग आहे.
दोन कालखंडांत उलगडणारी कथा
वेबसीरिजची कथा दोन वेगवेगळ्या काळात घडते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये असलेला अमरिंदर सिंह जपानी सैन्याच्या ताब्यात जातो. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं प्रेरणादायी भाषण ऐकून तो आझाद हिंद सेनेत सामील होण्याचा निर्णय घेतो.
दुसरीकडे, 1996 मध्ये वृद्ध झालेला अमरिंदर आपल्या नातवासोबत संवाद साधताना भूतकाळातील आठवणी सांगतो आणि त्यातून संपूर्ण कथा उलगडत जाते. विशेष म्हणजे या वेबसीरिजला शाहरुख खान यांचा प्रभावी व्हॉइसओव्हर लाभला आहे.
देशभक्तीचा संदेश देणारी वेबसीरिज
ही वेबसीरिज केवळ युद्धावर आधारित नाही, तर देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची आणि स्वातंत्र्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेल्या दुर्लक्षाचीही कथा सांगते. अत्यंत मर्यादित साधनसामग्रीत लढणाऱ्या सैनिकांचे आयुष्य, त्यांचे बलिदान आणि त्यांची जिद्द याचं वास्तववादी चित्रण या मालिकेत पाहायला मिळतं. यासोबतच अनेकतेत एकता आणि देशासाठी एकत्र उभे राहण्याचा संदेशही ही मालिका देते.
कुठे पाहता येईल?
देशभक्ती, इतिहास, प्रेम आणि थरार यांचा संगम असलेली ‘द फॉरगॉटन आर्मी: आझादी के लिए’ ही वेबसीरिज Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. ‘अल्फा’नंतर शर्वरी वाघचा वेगळा अभिनय पाहायचा असेल, तर ही वेबसीरिज नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवी.