राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसले आहे. पक्षातील या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. आज उद्धव ठाकरे यानी संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबईत या लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
भाजप ईशान्य मुंबईची जागा मिंध्यांना सोडणार आहे का?
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘त्या मिंधेला कुणी आमदार केलं? मंत्री कोणी केलं? भाजपशी जुळलं असतं तर निवडून आलेल्या आमदारांपैकी कुणाला तरी मुख्यमंत्री केलं असतं. माझे परतीचे दोर कापले. भाजपने पाठीत वार केले. भाजपने वचन मोडलं. मला नाईलाजाने जबाबदारी घ्यावी लागली. कोरोनाच्या काळात आपण राज्य व्यवस्थित ठेवलं. आपण कर्जमुक्ती आणि कर्जमाफी करून दाखवली. तिकडे गेल्यावर काही भाजप ही जागा सोडणार आहे का? भाजपने जाहीर करावं मिंधे ही जागा तुला घे. निवडणूक लढवायला या गद्दाराला मिंधेकडे गेला तरी आम्ही जागा सोडतो हे भाजपने जाहीर करावं.’
जीवाला जीव देणारी माणसं भाड्याने मिळणार नाहीत
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘भाड्याने गादी मिळेल, खुर्ची मिळेल पण जीवाला जीव देणारी माणसं भाड्याने मिळणार नाही. मी खचलो नाही. खचू शकत नाही. अशी संकटे आजपर्यंत पाहिली. संकटाच्या छाताडावर चालून जा माझ्या वडिलांनी शिकवलं. असेल हिंमत तर मैदानात उतर. मला अभिमान आहे. एखादा पक्ष असता तर गळपटून बसला असता. तुम्ही आलात. त्वेषाने आलात. याचा अभिमान आहे. तुमच्या मनातील आग आहे.
उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
कार्यकर्त्यांना आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आपल्याशी गद्दारी झाली. विश्वासघात झाला. याचा सूड घ्यावा लागेल. परत तयारीला लागा. गद्दाराला आव्हान देतोय, गद्दाराच्या बापाला आव्हान देतोय, गद्दाराच्या आजोबालाही आव्हान देतोय. तुमच्या पक्षाची कॉक्रोचने मस्ती उतरवली. भाजपपेक्षा त्यांची जास्त सदस्य संख्या झाली आहे. हा उद्रेक वाढत चालला आहे. तरुण ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. आम्ही जय श्रीराम बोलतो. हर हर महादेव म्हणतो आणि जय शिवरायही बोलतो. आम्ही लोकांना वेडं नाही करणार.’