Last Updated:
तुम्ही बाहेर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये आवडीने जेवायला जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठा धोक्याचा इशारा आहे.
पुणे: पुणेकरांनो, तुम्हाला घरी जेवण बनवण्याचा कंटाळा आला किंवा विकेंड असला की आवडीने जेवण्यासाठी हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये जाता का? मात्र, हा बाहेर खाण्याचा आनंद तुमच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतो, याची कदाचित तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुम्ही बाहेर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये आवडीने जेवायला जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठा धोक्याचा इशारा आहे. पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत हॉटेल्स आणि बेकरींवर एकापाठोपाठ एक छापे टाकत मोठी कारवाई केली आहे.
आरोग्याशी खेळणाऱ्या तब्बल १२ नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींचे परवाने प्रशासनाने तात्काळ निलंबित केले आहेत. अनेक हॉटेल्सच्या किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या छाप्यात उघडकीस आले. या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.
प्रशासनाने कारवाई केलेल्या १२ आस्थापनांमध्ये पुण्यातील अतिशय हायप्रोफाईल आणि गर्दीच्या ठिकाणांचा समावेश आहे. बालेवाडी, कल्याणीनगर आणि मार्केट यार्ड, कामशेत, जुन्नर आणि खेड परिसर, तसंच पिंपरी-चिंचवड (PCMC), बावधन आणि औंध परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय शेजारील सातारा जिल्ह्यातील वडूज येथील हॉटेल्स आणि बेकरींवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान चिंचवड, पंढरपूर आणि सातारा जिल्ह्यातील वडूज येथे तीन वेगवेगळ्या आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत तब्बल ३ लाख ४८ हजार ७८ रुपयांचा बेकायदेशीर व प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. केवळ परवाने निलंबित करून प्रशासन थांबलेले नाही, तर याप्रकरणी संबंधित मालकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. बाहेर खाताना आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे, हेच या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
Pune,Maharashtra
पुणेकरांनो, हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये आवडीनं खाताय? आरोग्याशी खेळताय, FDA ची पुन्हा मोठी कारवाई, 5 जणांना अटक
