पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

वारकऱ्यांना शुद्ध आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हॉटेल्सचे व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

News18
News18

सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभाग अलर्ट मोडवर असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सोलापूर विभागाने पंढरपूरमध्ये धडक कारवाई केली आहे. वारकऱ्यांना शुद्ध आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हॉटेल्सचे व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरातील 217 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी आणि प्रसाद विक्रेत्यांचा समावेश होता. या तपासणी मोहिमेदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे 172 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

तीन आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश 

तपासणीत अनियमितता आढळल्याने तीन आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मंगलमूर्ती मिसळ व भेळ (तीन रस्ता, शेगाव दुमाला), हॉटेल स्वरा अँड चायनीज सेंटर (शेगाव दुमाला) आणि हॉटेल श्री विष्णू सहस्रनाम (शेगाव दुमाला) यांचा समावेश आहे. या हॉटेल्सचे व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

कठोर कारवाई  करण्याचे आदेश 

आषाढी एकादशीनिमित्त देशभरातून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतात. या काळात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे वारकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, वापरले जाणारे तेल, रंग आणि इतर घटकांची गुणवत्ता याबाबत काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. 14 जुलै 2026 पर्यंत ही धडक तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. वारकऱ्यांना शुद्ध प्रसाद आणि शुद्ध जेवण न दिल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी 18002223635 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *