अहिल्यानगर : देशात नीट पेपर (NEET) फुटीवरुन चांगलाच संताप पाहायला मिळाला होता, त्यानंतर आता राजधानी दिल्लीत या नीट पेपरफुटीची धग दिसून आली. दिल्लीत सीजेपी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातही आज पालक, विद्यार्थी रस्त्यावर उतरुन आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. अहिल्यानगर (Ahilyanagar) येथेही दुसऱ्यांदा नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनी आपला संताप व्यक्त केला. तसेच, पुन्हा 2027 मध्ये नीटचा पेपर फुटणार नाही, याची गॅरंटी आम्हाला कोण देणार? असा सवाल देखील विद्यार्थीनीने विचारला.
देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये NEET परीक्षेचा पेपर फुटल्यावरुन तीव्र संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीसह विविध ठिकाणी आंदोलनही करण्यात येत आहे. सरकारने पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले, तरी विद्यार्थी आणि पालकांमधील नाराजी अद्याप कायम आहे. अहिल्यानगरमधील हर्षाली यादवने दोन वेळा नीट परीक्षा दिली, तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हर्षालीच्या कोचिंगचा खर्च उचलला. मात्र, पेपरफुटीमुळे तिला पुन्हा परीक्षा द्यावी लागली. दुसऱ्या प्रयत्नात अपेक्षित गुण मिळाले नाहीत. या धक्क्यामुळे तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. आता पुन्हा परीक्षेची तयारी करायची आहे, मात्र कोचिंगसाठी आवश्यक पैसे नसल्याने तिच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
दुसरीकडे, अहिल्यानगरच्या निर्मिती साळवे हिने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षेत 500 हून अधिक गुण मिळवले होते. मात्र, पुन्हा परीक्षा द्यावी लागल्यानंतर तिला केवळ 200 गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली आहे. भविष्यात पुन्हा परीक्षा दिल्यास पेपरफुटी होणार नाही, याची हमी कोण देणार, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. निर्मितीची आई भारती साळवे यांनी सांगितले की, मुलीच्या शिक्षणासाठी आम्ही बँकेतून कर्ज घेतले. वारंवार परीक्षा द्यावी लागत असल्याने विद्यार्थी आणि पालक दोघांनाही मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे… अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी नीट परीक्षा प्रत्येक राज्यात स्वतंत्रपणे घेण्याची मागणी केली आहे… त्यामुळे पेपरफुटीच्या घटना कमी होतील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल, असे त्यांचे मत आहे.
संभाजीनगरमध्ये आंदोलन
देशभर पेटलेल्या CJP च्या आंदोलनाची धग छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनाला शहरातील वकील संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे. क्रांती चौकात मोठ्या संख्येने वकील एकत्र येत सरकारच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या समर्थनार्थही आवाज उठवण्यात आला. आंदोलनामुळे क्रांती चौक परिसर काही काळ घोषणाबाजी केली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रत्नागिरीतही दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत दिल्लीच्या जंतर-मंतर आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ने आज दापोलीत आक्रमक मोर्चा काढला. विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. याचबरोबर अनुसूचित जातींच्या प्रस्तावित उपवर्गीकरणालाही तीव्र विरोध दर्शवत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चानंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून, उपवर्गीकरण रद्द न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा आरपीआयने दिला आहे.
हेही वाचा
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय