Sonam Wangchuk: राजधानी दिल्लीच्या जंतर मंतर येथे 21 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी जबरदस्तीने उचलून सफदरजंग रुग्णालयात नेले. आंदोलकांनी पोलिसांना विरोध केल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी बळजबरीने त्यांनाही हाकलून देण्यास सुरुवात केली आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले, “पोलिसांनी सोनम सरांना शिवीगाळ केली आणि त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात ओढले. पोलिसांनी मलाही मारहाण केली. मी सुद्धा आजपासून उपोषण सुरू करणार आहे. आम्ही पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करतो.” पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक उपोषणावर आहेत. त्यांची प्रकृती खालावत असून, त्यांचे वजन अंदाजे 9.5 किलोने कमी झाले आहे.
वांगचुक यांच्यासह तीन विद्यार्थीही उपोषणावर
वांगचुक यांच्यासोबत, आयसाचे (AISA) विद्यार्थी नेहा, अमीन आणि मनीष हे गेल्या 21 दिवसांपासून जंतर मंतर येथे उपोषणावर आहेत. त्यांचे उपोषण अजूनही सुरू आहे. तीव्र हायपोग्लायसेमियामुळे नेहाला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तर अमीन आणि मनीष यांची प्रकृतीही खालावत आहे.
कारवाईवर दिल्ली पोलिसांचं म्हणणं काय?
सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच पोलिसांनी जंतर-मंतर इथे ही कारवाई केली. प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे, हे लक्षात घेऊन, न्यायालयानं यापूर्वीच सोनम वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचं, तसेच त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख ठेवून त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश दिले होते.
सोनम वांगचुक यांचा VIDEO मेसेज
सलग 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती सतत खालावत होती, वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री एक व्हिडीओ मेसेज जारी केलेला. ज्यामध्ये त्यांनी आपलं सुमारे 20 टक्के वजन कमी केल्याचं सांगितलं. तसेच, त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. तरीही त्यांचं मनोधैर्य आणि मानसिक स्थिती खंबीर होती.
या व्हिडीओद्वारे, वांगचुक यांनी 20 जुलै रोजी नियोजित असलेल्या ‘चलो संसद’ (संसदेकडे कूच) रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना केलेलं. त्यांनी म्हटलं की, जर कांद्याच्या दरांबाबत सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकतं, तर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता यांबाबतही सरकारची जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे. ‘नीट’ (NEET) परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये केला आणि या मुद्द्यावर सरकारनं उत्तर दिलंच पाहिजे, असं ठामपणे सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला