दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच


मुंबई : राजधानी दिल्लीत (Delhi) विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीवरुन उभारलेल्या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातही आंदोलनाची धग पसरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियातूनही तरुणाई व्यक्त होत असून दिल्लीतील आंदोलनास (CJP Protest)आपला पाठिंबा दिला जात आहे. मात्र, दिल्ली पोलिसांकडून (Police) आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पोलिसांनी डिजिटल पेट्रोलिंग सुरू केल्याचं दिसून येत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या सीजेपी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यावेळी विशेष तयारी केली होती. 

दिल्लीतील मोठ्या आंदोलनांचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तब्बल 14 दिवस सोशल मीडिया मॉनिटरिंग, गुप्त माहिती संकलन आणि प्रत्यक्ष मैदानावरील विशेष नियोजनाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवली. राज्यभरात सीजेपीच्या समर्थनार्थ एकूण 98 ठिकाणी आंदोलने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

14 दिवस सोशल मीडियावर विशेष नजर

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य आंदोलनांची शक्यता लक्षात घेऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेष डिजिटल पेट्रोलिंग करण्यात आले. आंदोलनाशी संबंधित हॅशटॅग, कीवर्ड्स तसेच सातत्याने पोस्ट करणाऱ्या अकाउंट्सवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आणि त्याचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींच्या ऑनलाइन हालचालींचेही विश्लेषण करण्यात आले. या डिजिटल मॉनिटरिंगमुळे संभाव्य गर्दी, आंदोलनाची ठिकाणे आणि आयोजकांविषयी महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

त्री-स्तरीय रणनीतीमुळे परिस्थिती नियंत्रणात

आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी तीन स्तरांवर नियोजन केले होते. पहिल्या टप्प्यात सोशल मीडिया ट्रेंड्स, ऑनलाइन आयोजक आणि संबंधित हालचालींवर लक्ष ठेवून गुप्त माहिती संकलित करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात दादर रेल्वे स्थानकासह प्रमुख प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या अनेक प्रमुख व्यक्तींना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता कमी झाली. तिसऱ्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्रांकडे जाणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यांमध्ये हलविण्यात आले, जेणेकरून कोणत्याही ठिकाणी मोठा जमाव जमा होऊ नये.

राज्यातील 98 ठिकाणी आंदोलने

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरासह कोल्हापूरमधील शिवाजी चौक, पुणे, गडचिरोली आणि राज्यातील अन्य भागांमध्ये मिळून एकूण ९८ ठिकाणी आंदोलने झाली. पोलिसांचा दावा आहे की, डिजिटल मॉनिटरिंग, गुप्त माहितीचे प्रभावी समन्वय आणि वेळेवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात राहिली असून कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही.

हेही वाचा

…तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *