The India Story Poster: सामाजिक आशय असलेल्या बहुचर्चित ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) या कोर्टरूम ड्रामाचा आणखी एक प्रभावी पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहयोगाने साकारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे.
येत्या 24 जुलै 2026 रोजी हा सिनेमा जगभरातील थिएटर्समध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कीटकनाशक शेती आणि त्याचे जनतेच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम या संवेदनशील विषयावर आधारित असलेल्या या सिनेमात एका प्रभावी कोर्टरूम ड्रामामधून समाजाला विचार करायला भाग पाडणारा विषय मांडण्यात आला आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे अत्यंत तणावपूर्ण आणि भावनिक प्रसंगात दिसत आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखा एका धक्कादायक सत्याचा शोध घेत असताना त्यांना कोणत्या संघर्षाला सामोरे जावे लागते, याची प्रभावी झलक या पोस्टरमधून पाहायला मिळते.

गजबजलेल्या भाजी मार्केटच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर साकारण्यात आले आहे. संतप्त विक्रेत्यांचा जमाव काजल आणि श्रेयस यांच्याभोवती जमलेला असून, त्यांच्यावर बोटे दाखवत भाज्या फेकताना दिसतो. दोन्ही प्रमुख कलाकारांच्या चेहऱ्यावरील भीती, हवेत उडणाऱ्या भाज्या आणि संतप्त गर्दी यामुळे सत्य उघड करण्याचे धाडस करणाऱ्यांना समाजाकडून कसा विरोध सहन करावा लागतो, याचे प्रभावी चित्रण पोस्टरमध्ये करण्यात आले आहे. “स्लो पॉइझन इन प्रोग्रेस…” ही टॅगलाईन चित्रपटाच्या मूळ आशयाला अधिक ठळक करते आणि लाखो लोकांच्या आयुष्यावर शांतपणे परिणाम करणाऱ्या अदृश्य धोक्याकडे लक्ष वेधते.
याविषयी दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, “हे पोस्टर सत्य बोलण्याची किंमत दाखवते. फसवणुकीवर उभ्या असलेल्या व्यवस्थेला जेव्हा आव्हान दिले जाते, तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया भीती आणि संतापाचीच असते. ‘द इंडिया स्टोरी’मधील प्रत्येक दृश्य हा संघर्ष प्रामाणिकपणे मांडण्यासाठी तयार करण्यात आला आहे, जेणेकरून प्रेक्षकांनी ते काय खातात आणि कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, याचा पुन्हा विचार करावा.”
या चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक साईंदाणे, अनिता जाधव, विनायक साईंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. चित्रपटाचे छायांकन निशांत भागवत, संगीत मंगेश ढाकडे, संकलन आशीष म्हात्रे, गीतलेखन शकील आझमी, तर ध्वनी संयोजन अनमोल भावे यांनी केले आहे.
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव