मुंबईतल्या शेकडो झाडांचा बळी घेणारे मुंबई महापालिकेचच अधिकारी, खळबळजनक पुरावे समोर | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

धोकादायक आणि आतून पोकळ झालेल्या झाडांमध्ये काँक्रीट आणि फोम भरावा, असे पालिकेच्या उद्यान विभागाने काढलेल्या एका कंत्राटात थेटपणे नमूद करण्यात आले आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील शेकडो झाडांचा बळी घेण्यास मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने काढलेल्या कंत्राटांमधूनच झाडांना जीवे मारण्याचे धक्कादायक पुरावे समोर आले असून, यामुळे पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोकळ झाडांमध्ये काँक्रीट भरण्याचा अजब फतवा

मनसेने समोर आणलेल्या पुराव्यांनुसार, पालिकेच्या उद्यान विभागाने काढलेल्या एका कंत्राटात थेट असे नमूद करण्यात आले आहे की, धोकादायक आणि आतून पोकळ झालेल्या झाडांमध्ये काँक्रीट आणि फोम भरावा. वास्तविक झाडांच्या पोकळीत काँक्रीट किंवा रासायनिक फोम भरल्यामुळे झाडांचे जिवंत अस्तित्व धोक्यात येते, त्यांचे पोषण थांबते आणि ती आतून कुजून मृत होतात. पर्यावरण शास्त्राच्या कोणत्याही नियमात न बसणारी ही कृती थेट पालिकेच्या अधिकृत कंत्राटाचा भाग कशी असू शकते? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

अत्याधुनिक उपकरणांशिवाय २४ कंत्राटदारांना काम

वर्ष २०२४ मध्ये मुंबई महापालिकेने शहरातील धोकादायक झाडांचे स्कॅनिंग करण्यासाठी २४ कंत्राटदारांची नियुक्ती केली होती. मात्र, यापैकी कोणत्याही कंत्राटदाराकडे झाडांचे अचूक स्कॅनिंग करणारी अत्याधुनिक उपकरणे किंवा यंत्रसामग्री उपलब्ध नाही. अशा अपुऱ्या आणि अकार्यक्षम कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देऊन मुंबईतील झाडांचे भविष्य धोक्यात आणले गेले आहे, असा मनसेचा आरोप आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली?

या संपूर्ण प्रकरणात एक मोठा उघडकीस आला आहे तो म्हणजे, २०२४ मध्येच ‘ट्री टेक’ नावाच्या कंपनीने अत्याधुनिक स्कॅनिंग मशीनद्वारे मुंबईतील झाडांची तपासणी करून एक सविस्तर अहवाल सादर केला होता. या शास्त्रोक्त अहवालावर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही पालिकेच्या उद्यान विभागाने त्या अहवालावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्याऐवजी, झाडांना मारक ठरणाऱ्या काँक्रीटीकरणाच्या वादग्रस्त कंत्राटांना मंजुरी देण्यात आली, असा गंभीर आरोप मनसेने केला आहे.

मुंबईकरांच्या जीवाशी खेळ

पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत झाडे आणि त्यांच्या मोठ्या फांद्या कोसळून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. एकीकडे धोकादायक झाडांची योग्य काळजी घेण्याचा दावा पालिकेकडून केला जात असताना, दुसरीकडे मात्र झाडांना आतून कमकुवत करणारी कंत्राटे दिली जात आहेत. या निष्काळजीपणामुळे भविष्यात आणखी दुर्घटना घडल्यास त्याला संपूर्णपणे पालिकेचे उद्यान विभाग आणि संबंधित अधिकारीच जबाबदार असतील, असे मनसेने म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *