Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू


Dhule: धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या 21 वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Dhule News) या प्रकरणात संबंधित डॉक्टरांनी आवश्यक रक्त उपलब्ध होण्यापूर्वीच प्रसूती केल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर आंदोलन करत संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी केली. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, या प्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर पिंपळनेरमध्ये रात्रभर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, देगाव येथील पूनम सोनू अहिरे (वय 21) यांना प्रसूतीसाठी पिंपळनेर बसस्थानक परिसरातील तावडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रक्ताची गरज असल्याचे सांगत डॉक्टरांनी नातेवाईकांना सटाणा येथून रक्त आणण्यास सांगितले. मात्र, नातेवाईक रक्त घेऊन येण्यापूर्वीच प्रसूती करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पूनम अहिरे यांची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, रुग्णवाहिका येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत रुग्णालयाबाहेर तीव्र संताप व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच देगाव येथील शेकडो ग्रामस्थ पिंपळनेरमध्ये दाखल झाले. संबंधित डॉक्टरवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यावेळी रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान रुग्णालयावर दगडफेक झाल्याची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नातेवाईकांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यानंतर रात्री उशिरा संबंधित डॉक्टर राहुल तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत असून मृत्यूमागील नेमके कारण आणि उपचार प्रक्रियेत कोणतीही हलगर्जी झाली का, याचा तपास केला जात आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *