Nitesh Rane : महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना 2013 मधील धारगळ पेडणे टोल नाका तोडफोड आणि मारहाण प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 13 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा शेवट न्यायालयाच्या या निर्णयाने झाला.
नेमकं प्रकरण काय?
3 डिसेंबर 2013 ला ‘स्वाभिमान संघटना’चे प्रमुख नितेश राणे आपल्या कामासाठी गोव्यात जात होते. नितेश राणे आपल्या समर्थकांसह सावंतवाडीहून गोव्यातील कळंगुटकडे जात असताना धारगळ टोल नाक्यावर पोहोचले. टोल कर्मचाऱ्यांनी नियमाप्रमाणे प्रवेश शुल्काची मागणी केली. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचा आरोप करण्यात आला. टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली तसेच टोल बूथची तोडफोड करण्यात आल्याची तक्रार पेडणे पोलिसांकडे दाखल झाली होती. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करून म्हापसा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात एकूण नऊ आरोपी होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान नितेश राणे काही वेळा न्यायालयात गैरहजर राहिल्याने काही दिवसांपूर्वी म्हापसा न्यायालयाने त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर नितेश राणे यांना मोठा कायदेशीर दिलासा
मात्र, आता झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षी आणि युक्तिवादाचा विचार करून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर नितेश राणे यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला असून, या निकालाकडे गोवा आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
मंत्री नितेश राणे यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात नितेश राणे यांच्यासह आणखी आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनाही जामीन मंजूर झाला होता. घटनेच्या दिवशी नितेश राणे यांच्या वाहनांचा ताफा महाराष्ट्रातून गोव्याकडे एका खासगी कार्यक्रमासाठी जात असताना नितेश राणे यांचा टोल बुथ कर्मचाऱ्यांशी हा कथित वाद झाला होता. नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली आणि तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा सरकारी पक्षाचा आरोप होता.
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया