हे गाणं ऐकताच अनेकजण आपोआप धरतात ठेका, 44 वर्षांपासून भारतासह इतर देशांमध्ये देखील लोकप्रिय – Marathi News | I am a Disco Dancer song massive hit became Mithun Chakraborty India first 100 crore film


बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि त्यांची गाणी भारतासह जगभरात लोकप्रिय झाली आहेत. मात्र काही गाणी अशी असतात, जी केवळ सुपरहिट ठरत नाहीत, तर संपूर्ण पिढीची ओळख बनतात. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील ‘I Am A Disco Dancer’ हे असेच एक अजरामर गाणं आहे. या गाण्याने केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान, चीन, रशिया आणि अनेक देशांमध्ये लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. याच गाण्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांना ‘डिस्को किंग’ अशी ओळख मिळाली.

‘आई एम अ डिस्को डांसर’ हे गाणे 1982 मध्ये प्रदर्शित झाले आणि अल्पावधीतच डिस्को संगीताचे प्रतीक बनले. या गाण्याचे संगीत प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांनी दिले होते, तर गायक विजय बेनेडिक्ट यांनी आपल्या दमदार आवाजात ते गायले होते. या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे विजय बेनेडिक्ट यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली आणि त्यांच्या गायन कारकिर्दीला मोठी चालना मिळाली.

आजही विविध रिअॅलिटी शोमध्ये मिथुन चक्रवर्तींना याच गाण्यावर नृत्य करण्यासाठी विशेष निमंत्रण दिले जाते. इतकी वर्षे उलटल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

चीनमध्येही मिळाला गोल्ड अवॉर्ड

‘डिस्को डान्सर’मधील गाणी इतकी लोकप्रिय झाली की या चित्रपटाच्या संगीताला चीनमध्ये गोल्ड अवॉर्ड मिळाला. भारताबाहेरही या चित्रपटाने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. दक्षिण आणि मध्य आशिया, पूर्व व पश्चिम आफ्रिका, मध्य पूर्व, पूर्व आशिया, तुर्की तसेच तत्कालीन सोव्हिएत संघात या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

भारतातील पहिला 100 कोटींचा चित्रपट

‘डिस्को डान्सर’ चित्रपटाला जागतिक स्तरावर मोठे यश मिळाले. अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरातून सुमारे 100.68 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे तो 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला.

या चित्रपटाचा हा विक्रम तब्बल 12 वर्षे अबाधित राहिला. त्यानंतर 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘हम आपके हैं कौन..!’ या चित्रपटाने सुमारे 128 कोटी रुपयांची कमाई करत हा विक्रम मोडला. चार दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही हे गाणे आजही संगीतप्रेमी आणि नृत्यप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *