खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब


Sanjay Dina Patil on Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून ईशान्य मुंबईतील ‘फुटीर’ खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली  आहे. संजय पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत, त्यांनी “मी याआधी 5 लोकांना ठार केले आहे” असे धक्कादायक विधान केल्याचा दावा राऊत यांनी पत्रात केला आहे. या आत्मकबुलीनंतर “संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण आणि त्यांना कधी व का ठार केले?” असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर तातडीने हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि ‘युएपीए’ (UAPA) अंतर्गत अटक करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

“माझ्या नादाला लागू नका, सरळ स्मशानात पाठवीन”

पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, फुटलेले खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. या फुटीरतेविरुद्ध महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप असून मतदार ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र, ईशान्य मुंबईतील खासदार संजय पाटील यांनी या आंदोलनकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. “माझ्या नादाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन,” असे प्रक्षोभक वक्तव्य पाटील यांनी केल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

दहशतवादविरोधी पथकाद्वारे (ATS) चौकशीची मागणी

खासदार संजय पाटील यांनी केवळ 5 जणांच्या हत्येची कबुलीच दिली नाही, तर “माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन,” अशीही धमकी दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एका लोकप्रतिनिधीकडून बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले आहेत की त्यांना ते एखाद्या दहशतवादी टोळीकडून मिळाले आहेत? याची तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी दहशतवादविरोधी पथकाची (ATS) मदत घेऊन त्यांच्या घराची झडती घेण्यात यावी आणि देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्यांच्यावर ‘युएपीए’ (UAPA) अंतर्गत कारवाई व्हावी, अशी आक्रमक मागणी राऊत यांनी केली आहे.

सर्वस्वी जबाबदारी संजय पाटलांची

संजय पाटील यांची ही सर्व वक्तव्ये ते दहशतवाद आणि गुन्हेगारी कृत्यात सहभागी असण्याचे स्पष्ट पुरावे आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करतानाच राऊत यांनी इशारा दिला आहे की, जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर जनतेच्या सुरक्षेसाठी आपल्याला न्यायालयात दाद मागावी लागेल. तसेच, या धमकीच्या वातावरणामुळे जर आगामी काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाला किंवा खून झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी खासदार संजय पाटील यांच्यावरच राहील, असा इशाराही दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *