Last Updated:
मुंबई लोकलमध्ये पावसाच्या पाण्यावरून झालेल्या वादात रोशन सुवर्णाने मयंक लोहारची चाकूने हत्या केली, आरोपी नशेत होता, पोलिस चाकू आणि त्याच्या मित्राचा शोध घेत आहेत
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, याच लोकलच्या डब्यात एका साध्या वादातून प्रवाशाची निर्घृण हत्या केल्या धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी रोशन सुवर्णा याने पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारे खुलासे केले. पावसाचं पाणी डब्यात येत असल्याने दरवाजा लावण्यावरुन झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. मयंक या वादात कसा सापडला, त्याने हल्ला कसा आणि का केला? चाकू कुठून आला याची धक्कादायक कबुली आरोपीने दिली आहे.
पोलिस चौकशीत आरोपी रोशन सुवर्णाने सांगितले की, घटनेच्या दिवशी त्याने दिवसभर भरपूर दारू रिचवली होती. दारूच्या नशेतच तो अंधेरी स्थानकातून लोकल पकडून आपल्या घराच्या दिशेने निघाला होता. पाऊस असल्याने लोकलच्या डब्यात पावसाचे पाणी आत येत होते. यामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून रोशनचा तिथेच प्रवास करत असलेला तरुण मयंक लोहार याच्याशी जोरदार वाद सुरू झाला.
दार बंद करण्यावरुन शाब्दिक बाचाबाची सुरू असताना मयंकने रागाच्या भरात रोशनच्या डोळ्यावर थेट बुक्का मारला. इतकंच नाही तर डब्यातील इतर काही प्रवाशांनीही मयंकची बाजू घेत रोशनला मारहाण करायला सुरुवात केली. दारूची नशा आणि सर्वांसमोर झालेली मारहाण यामुळे रोशनचा ताबा सुटला आणि राग अनावर झाला. प्रचंड संतापाच्या भरात त्याने आपल्या बॅगेत हात टाकला आणि थेट धारदार चाकू बाहेर काढला.
काही समजण्याच्या आत रोशनने मयंकवर एकापाठोपाठ एक सपासप वार करण्यास सुरुवात केली. मयंकच्या छातीवर आणि पोटावर हे वार झाल्यामुळे डब्यात रक्ताचा सडा पडला आणि प्रचंड गंभीर जखमी झालेल्या मयंकचा जागेवरच वेदनादायक मृत्यू झाला.
लोकलमध्ये हत्येचे तांडव घडवून आणल्यानंतर डब्यात एकच खळबळ उडाली. लोकल जशी बोरिवली स्थानकाजवळ आली आणि तिचा वेग मंदावला, तशी रोशनने धावत्या लोकलधून खाली उडी मारली आणि तिथून पळ काढला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने हत्येसाठी वापरलेला तो रक्तरंजित चाकू बोरिवलीच्या एका सबवेमध्ये फेकून दिला. त्याने हा चाकू स्वतः खरेदी केला नसून, आपल्या एका मित्राकडून आधीच दोन चाकू मागून घेतले असल्याची मोठी कबुलीही पोलिसांना दिली आहे.
आरोपी रोशन सुवर्णाने पोलिसांना दिलेल्या या जबाबाने पोलिसही चक्रावून गेले आहेत. सध्या रेल्वे पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा रोशनने सांगितलेल्या प्रत्येक दाव्याची सखोल पडताळणी करत आहे. लोकलच्या डब्यातील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच, गुन्ह्यात वापरलेला चाकू शोधण्याचे काम सुरू असून, रोशनला हत्येसाठी शस्त्र पुरवणाऱ्या त्याच्या ‘त्या’ मित्राचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे मुंबई लोकल मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 25, 2026 10:22 AM IST
धावत्या लोकलमध्ये मयंकवरचा का केले वार? पोलिसी खाक्या पडताच आरोपी रोशन पोपटासारखं घडाघडा बोलला
