Last Updated:
Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला अखेर जामीन मिळाला आहे. ती मागील ७० ते ८० दिवसांपासून फरार होती.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला अखेर जामीन मिळाला आहे. ती मागील ७० ते ८० दिवसांपासून फरार होती. आता अखेर तिला अटकपूर्व जामीन दिला आहे. दैवी शक्तीचा आणि चमत्काराचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित प्रकरणात कल्पना खरातला नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जमीन फसवणूक प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार कोपळकर यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. न्यायालयाने कल्पना खरात यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर केला. हा आदेश देताना न्यायालयाने या प्रकरणातील काही महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवले असून, हा संपूर्ण वाद प्रामुख्याने दिवाणी स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे.
तब्बल २२ वर्षांनंतर गुन्हा दाखल!
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित जमीन व्यवहार हा २००४ मध्ये झाला होता. मात्र, तक्रारदार शिवराम माळी यांनी या व्यवहाराविरोधात तब्बल २२ वर्षांनंतर, म्हणजेच २०२६ मध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. न्यायालयाने या प्रदीर्घ विलंबाची गंभीर दखल घेतली. इतक्या मोठ्या कालावधीत तक्रारदार किंवा त्यांच्या भावांनी हे खरेदीखत रद्द करण्यासाठी अथवा जमिनीचा ताबा परत मिळवण्यासाठी कोणतीही दाद का मागितली नाही? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
तसेच, हा व्यवहार झाला त्या वेळी फसवणूक करण्याचा कोणताही अप्रामाणिक हेतू होता, असे तपासातून स्पष्ट होत नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे केवळ एका दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचे स्वरूप देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्राथमिक निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. यानंतर कल्पना खरातचा सशर्त अटकपूर्व जामीन दिला.
न्यायालयाच्या अटी आणि शर्ती
हा संपूर्ण व्यवहार कायदेशीर आणि नोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे झाल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने कल्पना खरात यांना जामीन दिला आहे. मात्र, हा दिलासा देताना काही कडक अटीही घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार, आरोपीने तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, चौकशीसाठी वेळोवेळी पोलीस ठाण्यात हजर राहावे आणि तपासात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र शिर्डी प्रकरणात मात्र अद्याप दिलासा दिला नाही.
शिर्डीच्या प्रकरणात दिलासा नाही
भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर कारवाई सुरू झाल्यानंतर, त्याच्या पत्नीचाही या कथित बेकायदेशीर व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचा आरोप झाला होता. यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरोधात जमीन फसवणुकीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणात मात्र न्यायालयाने कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे सिन्नरच्या गुन्ह्यात दिलासा मिळाला असला, तरी शिर्डीतील गुन्ह्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
Nashik,Maharashtra
Jun 25, 2026 11:03 AM IST
