नसरापूर अत्याचार प्रकरण : ‘तुला काय शिक्षा मिळावी तूच सांग’; न्यायाधीशांनी थेट विचारलं, आरोपीचं धक्कादायक उत्तर | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

न्यायाधीशांनी या प्रकरणात आरोपीलाच विचारलं की, तूच सांग तुला काय शिक्षा मिळावी? मात्र, आरोपीने इथेही फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी एक नवा आणि अंगावर काटा आणणारा बनाव रचला

पुणे नसरापूर प्रकरण
पुणे नसरापूर प्रकरण

पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधम आरोपी भीमराव कांबळे याला आज न्यायालयात आणलं आहे. कोर्टात या प्रकरणाच्या शिक्षेसाठी युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. न्यायाधीशांनी परखडपणे आरोपी भीमराव कांबळेला काही सवाल केले. यावेळी आरोपी कांबळेला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यायाधीशांनी या प्रकरणात आरोपीलाच विचारलं की, तूच सांग तुला काय शिक्षा मिळावी? मात्र, आरोपीने इथेही फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी एक नवा आणि अंगावर काटा आणणारा बनाव रचला. मात्र, त्याचा हा खोटेपणा न्यायाधीशांनी कोर्टातच उघडा पाडला. “तुझ्या विरोधात सर्व आरोप सिद्ध झालेत, आता तूच सांग तुला काय शिक्षा मिळावी?” असा थेट सवाल न्यायाधीशांनी विचारताच कोर्टातील वातावरण कमालीचे तापले.

“मी तिला गाठीशेव खायला घेऊन गेलो…”

आज सुनावणी सुरू असताना आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयाची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तो म्हणाला, “त्या दिवशी मी तिला प्रेमाने गाठीशेव खायला घेऊन गेलो होतो. मी तिला मारलेलं नाही. मी तिला घेऊन जात असताना अचानक माझा पाय घसरला आणि आम्ही दोघेही खाली पडलो. त्यातच तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तिचा मृत्यू झाला.”

आरोपीचा हा अत्यंत क्रूर आणि खोटा बनाव ऐकून कोर्टात उपस्थित असलेल्या पीडित चिमुरडीच्या आईला रडू कोसळले. आपल्या निष्पाप लेकीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम न्यायालयात उजळ माथ्याने खोटं बोलतोय हे पाहून तिचे काळीज हेलावले.

आधी गुन्हा कबूल कर, मग बोल…

आरोपीचा हा खोटा दावा ऐकल्यानंतर न्यायाधीश प्रचंड संतापले. पोलिसांनी सादर केलेले वैज्ञानिक पुरावे आणि डीएनए (DNA) अहवाल यावरून आरोपीचा गुन्हा आधीच सिद्ध झाला आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी त्याला कडक शब्दांत फटकारले आणि म्हटले, “प्रथम तू काय कृत्य केलं आहेस त्याची आठवण कर आणि मग काय ते सांग”

न्यायालयाने आरोपीला स्पष्ट सांगितले की, तुझ्याविरोधातील सर्व गंभीर गुन्हे आणि पुरावे सिद्ध झाले आहेत. आता या गुन्ह्यासाठी तुला कायद्यानुसार काय शिक्षा द्यायची, हे न्यायालय ठरवणार आहे. सरकारी पक्षाने आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी लावून धरली आहे.

मराठी बातम्या/पुणे/

नसरापूर अत्याचार प्रकरण : ‘तुला काय शिक्षा मिळावी तूच सांग’; न्यायाधीशांनी थेट विचारलं, आरोपीचं धक्कादायक उत्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *