कोर्टात 3 तास हाय-व्होल्टेज ड्रामा! जगाच्या इतिहासातील पहिलीच घटना; AIने मानवी वकिलाचा केला पराभव, क्लायंटचा 9 लाख रुपयांच्या दाव्यात विजय |


Last Updated:

Legal Chatbot: कृत्रिम बुद्धिमत्तेने न्यायव्यवस्थेतही इतिहास रचला असून ब्रिटनमध्ये AI-आधारित ‘गारफिल्ड AI’ने प्रथमच न्यायालयीन खटला जिंकत मानवी वकिलाचा पराभव केला आहे.

News18
News18

लंडन: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता केवळ फोटो तयार करणे, लेखन किंवा विविध तांत्रिक कामांपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता AI ने न्यायालयीन व्यवस्थेतही इतिहास रचला आहे. ब्रिटनमधील एका कायदेशीर प्रकरणात गारफिल्ड AI (Garfield AI) या AI चॅटबॉटने प्रत्यक्ष न्यायालयीन खटल्यात मानवी वकिलाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

हा जगातील पहिलाच प्रसंग मानला जात आहे. ज्यामध्ये AI आधारित कायदेशीर प्रणालीने न्यायालयीन खटला जिंकत आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहिला आहे.

क्लायंटचे सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान वाचवले

फ्रीलान्स मानव संसाधन (HR) अधिकारी टॅमिरेस कॅमेल टॅक्विडीर यांचे प्रतिनिधित्व करत गारफिल्ड AI ने 7,000 पाउंड (सुमारे 8.79 लाख रुपये) किमतीचा ‘स्मॉल क्लेम्स कोर्ट’मधील खटला जिंकला. हा खटला लढण्यासाठी टॅक्विडीर यांनी AI चॅटबॉटला केवळ 400 पाउंड (सुमारे 50,252 रुपये) शुल्क दिले. टॅक्विडीर यांनी एका हॉस्पिटॅलिटी व्यवसायाकडून थकीत फी वसूल करण्यासाठी हा दावा दाखल केला होता.

कमी खर्चात मोठा विजय

गारफिल्ड AI ने हा खटला जिंकत मोठा विक्रम केला. जर या प्रकरणासाठी पारंपरिक मानवी वकिलाची नियुक्ती केली असती तर क्लायंटला लाखो रुपयांचा खर्च आला असता. मात्र AI चॅटबॉटने सुमारे 50 हजार रुपयांत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया हाताळली आणि क्लायंटचा विजय मिळवून दिला.

न्यायालयाने AIच्या बाजूने दिला निकाल

खटला सुरू होण्यापूर्वी गारफिल्ड AI ने ‘वन एसेक्स कोर्ट’ येथील कनिष्ठ बॅरिस्टर डॉमिनिक ली यांची नियुक्ती केली. लंडनमधील वँड्सवर्थ काउंटी कोर्टात जवळपास तीन तास दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने गारफिल्ड AI ने नियुक्त केलेल्या बॅरिस्टरच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने विरोधी पक्षाचा दावा फेटाळून लावत क्लायंटच्या बाजूने निर्णय दिला.

विजयानंतर बॅरिस्टर डॉमिनिक ली म्हणाले, खटल्यासाठी तयार करण्यात आलेली कागदपत्रे अत्यंत सविस्तर आणि प्रभावी होती.

AI ने मानवी वकिलाविरोधातील पहिला खटला जिंकला

गारफिल्ड AI लॉ फर्मचे सहसंस्थापक फिलिप यंग यांनी लिंक्डइनवरील पोस्टमध्ये या ऐतिहासिक विजयाची माहिती दिली. ते म्हणाले, कायदा आणि न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रातील एका मोठ्या ऐतिहासिक यशाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. गारफिल्ड AI ने आपला पहिला न्यायालयीन खटला जिंकला असून तोही मानवी सॉलिसिटर्सविरुद्ध. त्यांच्या मते, एखाद्या AI वकिलाने मानवी वकिलाविरोधात न्यायालयीन खटला जिंकण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.

गारफिल्ड AI म्हणजे काय?

गारफिल्ड AI हा कायदेशीर सेवा देणारा AI चॅटबॉट असून त्याचे सहसंस्थापक फिलिप यंग आहेत. ब्रिटनमध्ये फक्त AI च्या माध्यमातून कायदेशीर सेवा देण्यासाठी अधिकृत मान्यता मिळालेली ही जगातील पहिली लॉ फर्म असल्याचे सांगितले जाते. ही संस्था पारंपरिक वकिलांप्रमाणे काम न करता AI च्या मदतीने कायदेशीर दस्तऐवज तयार करते, दावे दाखल करते आणि 10,000 पाउंड (सुमारे 12.5 लाख रुपये) पर्यंतच्या स्मॉल क्लेम्स कोर्टातील प्रकरणांमध्ये ग्राहकांना मदत करते.

AI ने तयार केली संपूर्ण केस

गारफिल्ड AI ला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ब्रिटनच्या सॉलिसिटर्स रेग्युलेशन अथॉरिटी (SRA) कडून अधिकृत मान्यता मिळाली होती. या प्रकरणात AI चॅटबॉटने स्वतः क्लायंटची संपूर्ण केस तयार केली.

AI चॅटबॉटने कायदेशीर कागदपत्रे तयार केली, चार साक्षीदारांचे जबाब तयार केले, आवश्यक पुरावे संकलित केले, आणि न्यायालयात क्लायंटची बाजू मांडण्यासाठी बॅरिस्टरची नियुक्ती केली.

यानंतर न्यायालयात तीन तास चाललेल्या सुनावणीनंतर गारफिल्ड AI ने मानवी वकिलाविरोधातील हा खटला जिंकत इतिहास घडवला. या विजयामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर भविष्यात कायदेशीर सेवांमध्ये अधिक व्यापक प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या/AI/

कोर्टात 3 तास हाय-व्होल्टेज ड्रामा! जगाच्या इतिहासातील पहिलीच घटना; AIने मानवी वकिलाचा केला पराभव, क्लायंटचा 9 लाख रुपयांच्या दाव्यात विजय



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *